Wednesday, February 29, 2012

'स्टेसी' - माझी अमेरिकेतील मैत्रीण


अमेरिकन माणूस हा पटकन कुणाशी बोलत नाही. पण एकदा त्याला, किंवा तिला, तुमच्या चांगल्या असण्याबद्दल खात्री पटली की त्यांची कळी खुलते. मग ते तुमच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारतात. त्यांना तुम्ही हवे-हवेसे वाटता...तुमच्याशी सारखं काहीतरी 'share ' करावेसे वाटते.
बाकी 'कायद्याच्या' साच्यात अडकलेल्या ह्या जीवनपद्धतीत आपुलकी सुद्धा 'लीगल' आहे की नाही असाच शोध घेणारी ही माणसं! त्यामुळे एकमेकांवर  विश्वास हा कमीच. पण ह्या साच्यात भावना कुठेतरी दडून बसतात आणि मग अचानक एका  विश्वास ठेवण्या-लायकीच्या माणसासमोर प्रकटतात! अशा ह्या 'साच्यात' दोन वर्ष वावरताना मला ती भेटली. आणि तिच्यासाठी 'विश्वास ठेवण्या-लायकीचा' होतो मी! तिचे नाव स्टेसी.


आमच्या विद्यापीठाच्या bachelors शाखेत ती शिकत होती. तिचा विषय होता biology ,जो माझा masters  चा देखील विषय होता.
खर्च जमवावा आणि अनुभव घ्यावा म्हणून मी शिकता-शिकता विद्यापीठाच्या 'बुक स्टोर' मध्ये काम करायचे ठरवले. ठरवले म्हणणे तसे चुकीचे...कारण प्रत्येकाला तसे करावेच लागते. ह्याच 'बुक स्टोर' मध्ये मला अनेक चांगले अनुभव तर आलेच पण अमेरिकन 'सामान्य माणूस' सुद्धा जवळून बघायला मिळाला.इथेच माझी आणि स्टेसीची प्रथम भेट झाली. खांद्यापर्यंत सोडलेले सुंदर सोनेरी केस, गालांवर किंचित नैसर्गिक लाल रंग, बेताची उंची, मुलींना शोभेल एवढीच रुंदी व सदैव हसरा, पांढरा शुभ्र चेहरा! कामाच्या पहिल्या दिवशी, मी माझ्या 'locker ' मध्ये सामान ठेवत असताना ही माझ्या बाजूच्या locker मध्ये तिचे सामान ठेवत होती. ( आमचे दोघांचे lockers  बाजू-बाजूला ठेवल्याबद्दल नियतीचे आभार! :D  ) अमेरिकन रीत असल्यामुळे आणि
शेजारी सुंदर मुलगी असल्यामुळे मी उद्गारलो . "शुभ प्रभात! कसं चाललंय?" " एकदम मजेत...आज माझा पहिला दिवस आहे", ती म्हणाली. आमच्या बोलण्याने वेग पकडला. तेव्हा उन्हाळा असल्यामुळे 'आज किती उकडतंय' हे आलंच त्यात! ( ह्या अमेरिकन लोकांना 'तापमान' ह्या विषयावर अनेक तास बोलता येईल!) आलेली पुस्तकं तपासायची, त्यांच्या विषयाप्रमाणे एकत्र करायची व त्यांना 'shelf ' मध्ये लावायची हे आमचे दोघांचे काम होते. त्यामुळे साहजिकच बोलणं होत असे. पण ह्या जोरावर 'मैत्री' व्हावी असं म्हणायला ती भारतीय नव्हती. :)
एकदा असंच काम करत असताना कुणीतरी मला विचारलं, " काय रे, तुमच्याकडे असाच उकाडा असतो का रे?" ( टेक्सास मध्ये प्रचंड उकडतं!) त्या व्यक्तीला मी भारतीय आहे हे माहिती होतं. स्टेसीला ह्या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले. " तू भारतावरून, एवढ्या लांबून, इकडे शिकायला आलास! दाट इज कूल! मी भारताबद्दल ऐकून आहे.....एकदा कधीतरी जायचे पण आहे. पण भारत सुरक्षित आहे का?" ह्या अनपेक्षित प्रश्नांनी माझे लक्ष वेधून घेतले. " तू भारतात येऊ शकतेस....इट इज सेफ ...डू नॉट वरी." मी तिला जणू आमंत्रणच देत होतो. माझ्या सुदैवाने तिला भारतात केवळ हत्ती, घोडे आहेत असे वाटत नव्हते! तिच्यामते भारत एक प्रगतीशील देश होता आणि त्यामुळे उत्सुकतेच्या भावनेने ती भारताबद्दल विचारात होती. कुठे कुठे तिने काय वाचले होते ह्याचा माझ्याकडून खुलासा करून घ्यायची.  तिच्या वर्गात अमेरिकेत वाढलेले भारतीय लोक होते पण खास भारतातून आलेला तिच्या पाहण्यात मी एकटाच होतो!
"तुला तुझ्या घरच्यांची आठवण येत नाही का रे? तुला इकडे कंटाळा येत असेल ना?" काम करताना एकदा अचानक तिने मला हा प्रश्न विचारला. मी अर्थात पहिल्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी दिले. पण मला इकडे कंटाळा येत नाही असं कळल्यावर तिने प्रचंड आश्चर्य व्यक्त केले! मग तू दिवसभर काय करतोस, घरी कधी बोलतोस, खाण्या-पिण्याचं काय करतोस, 'पार्टी' करतोस की नाही ह्या अनेक प्रकारच्या  प्रश्नांना मला सामोरे जावे लागले. पण तिच्याशी बोलायला मजा वाटायची. ह्याचे मुख्य कारण म्हणजे तिच्यातला साधेपणा. साधारण आपल्याकडे बोलले जाणारेच विषय आमच्या बोलण्यात येत. शेवटी इकडची काय आणि तिकडची काय, सामान्य माणसं सारखीच!
दिवस भर-भर चालले होते. बुक स्टोरची नोकरी संपली होती. बरीच लोकं परवडत नसल्यामुळे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना तात्पुरती सुट्टी दिली होती. त्यामुळे स्टेसीशी काहीच संपर्क नव्हता. बुक स्टोरचे बाकी लोक अधून मधून भेटायचे, थोडी औपचारिक विचारपूस होयची आणि मग आम्ही आपापल्या वाटा चालू लागायचो.
एकदा रात्री असाच कपडे धुण्यासाठी घराबाहेर पडलो.( होय! अमेरिकेत जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर सर्व भाडेकरूंसाठी एक 'laundry  machine  असतं. तिथे नंबर लाऊन कपडे धुवायचे असतात) कपडे 'washing ' करणाऱ्या यंत्रात टाकले, यंत्र सुरु केले आणि मागे वळलो. बघतो तर काय.... कपडे हातात घेऊन दारात स्टेसी उभी! " तू इथे कसा? तू इकडेच राहतोस का?" तिने मला विचारले. "ग्रेट! कधी पाहिलं नव्हतं तुला इकडे", मी उद्गारलो. " एनीवेज,आपण बुक-स्टोर सोडल्यावर भेटणं कठीण होतं. नालायक लोकं, आपल्याला जास्त तास दिले नाहीत कामाला. आधीच सांगायला पाहिजे होतं ना, डॉलर्स पण कमी देत होते. म्हणून मी बाहेर नोकरी करते. तू कुठे काम करतोस?"
संभाषणाच्या गाडीचे रूळ 'पगार' ह्या स्थानकावर जेव्हा येतात, तेव्हापासून ती गाडी पुढे भयंकर वेगाने आणि उत्साहाने पळू लागते!  " मी अमेरिकेत राहत नाही, त्यामुळे मला बाहेर काम करायला परवानगी नाही", मी उत्तरलो.( बाहेर ह्याचा अर्थ विद्यापीठाच्या हद्दीच्या बाहेर) "काय सांगतोस!  मग तू खर्च कसा भागवतोस?" तिने आश्चर्याने विचारले. मी नोकरी शोधत असल्यामुळे पुढे काही बोललो नाही.
त्यानंतर स्टेसी अधून-मधून भेटू लागली. आमच्या laundry room  च्या बाजूला बसायला छोटीशी जागा होती. ती मला बऱ्याच वेळेला तिकडे फोन वर बोलताना दिसायची. मला बघून हात करायची किव्हा कधी कधी येऊन बोलायची.  इकडचे तिकडचे प्रश्न विचारायची. नोकरी मिळाली का नाही ह्याची चौकशी करायची. अधून-मधून भारताबद्दल देखील विचारायची. मी पण थोडीफार उत्तरं देऊन निघून यायचो. दरम्यान मी एका मोटेल मध्ये रात्रपाळी करू लागलो होतो. 'तसल्या' नोकऱ्या करायला आम्हाला परवानगी नव्हती आणि म्हणून मी कुणा अमेरिकन माणसाला त्याची दाद लागू देत नव्हतो. आणि म्हणून मी नोकरी करतोय ह्याची स्टेसीला देखील कल्पना नव्हती.
एकदा नाताळच्या आदल्या दिवशी मी laundry  room  कडे गेलो असताना मला स्टेसी तिकडे दिसली. संध्याकाळची वेळ होती. त्यांनतर मला मोटेल वर जायचे होते. स्टेसीला नाताळच्या शुभेच्छा दिल्या व तिनेदेखील त्या मला हसत हसत परत दिल्या.
"मग, काय करणार नाताळच्या निमित्ताने?" मी एक सहज प्रश्न केला. स्टेसीचा चेहरा पडला  व ती मला सांगू लागली. " मी क्रिसमस असून घरी जाऊ शकत नाही.....मागच्यावर्षी पण नाही जाऊ शकले. डॉलर्सचा प्रॉब्लेम आहे रे....खर्च इतके वाढले आहेत.....मी काम करते तिकडे जास्त डॉलर्स पण मिळत नाही. मला माझ्या आईची खूप आठवण येते. माझे बाबा इराकला आहेत....युद्ध आहे ना!"
" म्हणजे, तू कुठे राहतेस?" मला अपेक्षित होतं की ती माझ्याच शहरात राहत असेल आणि रोज कॉलेजला यायचं तसं येत असेल.
" मी वर्जिनियाहून आले आहे. मी इकडे नाही राहत. आम्हाला टेक्सास स्वस्त पडतं रे. म्हणून मी मागच्या जुलैमध्ये इकडे शिकायला आले. तेव्हा मला नोकरी नव्हती. सारे डॉलर्स आई पाठवायची. पण नंतर ते महाग जायला लागले. घरचे भाडे, सगळ्याचे इंश्युरंस , वेगवेगळे कर भरणे ह्यात मला डॉलर्स पाठवणं कठीण होऊ लागलं. म्हणून मी इकडे नोकरी पत्करली. पण तुला माहिती आहे ना, आपल्याला बुक स्टोर मध्ये किती पगार मिळायचा....ते नुसतं काम करून घ्यायचे. म्हणून मी नोकरी बदलली. पण परिस्थिती तशीच आहे....काही उरत नाही. मागच्या वर्षी मी काही 'गिफ्ट' पाठवू शकली नाही माझ्या आईला....ह्यावर्षी देखील डॉलर्स नाही. मला बाबांना इराकला पण 'गिफ्ट' पाठवायचे आहे....पण काय करू.....इट इज नॉट इसी....आय मिस माय फादर सो मच!"             
स्टेसी हे सगळं शांतपणाने सांगत होती. डोळ्यात पाण्याचा एक थेंब नाही, उगीच हातवारे नाही, आवाज चढवलेला नव्ह्ता किंवा उगीच भावनात्मक दबलेला नव्ह्ता. तिच्या वागण्यात खूप 'maturity ' दिसत होती. परिस्थिती ही अशी आहे आणि  त्याच्याप्रमाणे आपण जगायचे आहे, ह्याची तयारी होती. मी भारताहून जरी आलो असलो, तरी तिची परिस्थिती बऱ्यापैकी माझ्यासारखीच होती.....आई-वडिलांपासून लांब, परिवारापासून लांब.
"मग तू वर्जिनियाला कधी जाणार?" मी विचारलं. खरं तर ह्या प्रश्नाचं एकच उत्तर होतं...डॉलर्स जमल्यावर. पण मला संवाद पुढे ढकलायचा होता. एक तर एवढी सुंदर मुलगी आपल्याशी बोलते आहे ही भावना तर दुसरीकडे एक नवीन कथा ऐकण्याची संधी. मला दोन्ही हवं होतं! "माहिती नाही रे.माझ्याकडे डॉलर्स जेव्हा येतील,जेव्हा साठतील तेव्हा मी ठरवीन. आजच मी माझ्या आजोबांशी बोलत होते.त्यांना पण माझी खूप आठवण येते. पण बिचारे इकडे येऊ शकत नाही.त्यांना जे पेन्शन मिळते त्यात त्यांना इकडे यायचा विमान प्रवास परवडत नाही. यु नो? मी त्यांची लाडकी नात आहे.मी बाळ होते तेव्हा माझे आजी-आजोबा ४ महिने राहिले होते आमच्याकडे. तेव्हापासून त्यांचा माझ्यावर जीव आहे."
हे सगळे मला नवीन होते. आम्हाला भारतात अमेरिकेबद्दल काय सांगितले
जाते? अमेरिकेत नात्यांना काहीच किंमत नाही.मुलं मोठी झाली की आई-वडिलांना विचारत  नाहीत. ( हे असं सांगण्यात अमेरिकेत गेलेल्यांपेक्षा न गेलेल्या लोकांची संख्या जास्त असते म्हणा! ) पण इथे तर, भारताप्रमाणे आजी-आजोबांचा नातवंडांवर जीव आहे. देश कुठलाही असो....सामान्य माणसं सारखीच की!
त्याचवर्षी मी भारतात जाऊन आलो होतो ह्याचे तिला फार कौतुक होते. त्या दिवशी तिने मला विचारले. " तू भारतात जाऊन आलास...कमाल आहे तुझी....एवढा खर्च कसा काय मानेज केलास?" तिच्या ह्या प्रश्नाने मात्र मला थोडे खजील झाल्यासारखे झाले. मी तिकिटाचे अर्धे पैसे घरून मागवले होते ह्याची तिला दाद नाही लागू दिली मी!
कुठे राहतात तुझे आजी-आजोबा?" मी विचारले. "वर्जिनियालाच का?"
"नाही रे. ते तर कॉलोरेडोला असतात. ते मला नेहमी म्हणतात, फोन वर बोलण्यात फक्त कृत्रिम मजा येते, तुला समोरासमोर बघावेसे वाटते, त्यात खरा आनंद आहे. आता आठ वर्ष झाली, मी त्यांना बघितले  नाही.जे काही बोलणं होतं ते फोनवरूनच!"
मी तिची अवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्या किंचित अंधुक वातावरणात तिने कानात घातलेला 'दागिना' ( दागिनाच म्हणतात ना हो?) चमकला आणि ती अधिक सुंदर दिसली! मग ती स्वतःच्या बाबांबद्दल सांगू लागली.
मी विषय काढलाच नव्ह्ता. तिला मात्र सगळं सांगावसं वाटलं. अमेरिकेत जीवन हे 'यंत्रसंस्कृती'शी मैत्री केलेलं. त्यामुळे कुणाला-कुणाशी बोलायला वेळ नसतो. आणि ऐकून घेणारे कुणी भेटले तर मग विचारांचे धरण फुटते आणि माणूस असा बोलका होतो.
" इराकचे युद्ध सुरु झाल्यापासून माझे बाबा तिकडेच आहेत. महिन्यातून एकदा फोन करतात. कधी कधी उशीर होतो.पण आम्हाला आता त्याची सवय झाली आहे. कधी कधी आम्ही त्यांना काही पाठवतो.मागच्यावर्षी त्यांनी मला एक 'फर'चा कुत्रा पाठवला होता. मला soft toys  खूप आवडतात! .मी तो माझ्याबरोबर इकडे घेऊन आले आहे. पण मला माझे बाबा हवे आहेत, काही वर्षांनी माझे लग्न होईल....तेव्हा मला ते इकडे हवे आहेत. लोक का युद्ध करतात रे? It  seperates  families !"
तिचा मुद्दा हा आम्हा सर्वांचाच मुद्दा आहे की! राजकारण्यांच्या स्वार्थापायी जगाचे नकाशे बदलत आले आहे, बदलत चालले आहेत आणि अजून किती दिवस बदलतील काही कल्पना नाही. पण तिच्या जिद्दीबद्दल माझ्या मनात कमालीचा आदर उत्पन्न झाला. अंदाजे वीस वर्षाची ही मुलगी....कमालीच्या आत्मविश्वासाने एकटी राहत होती.आठ वर्षांपासून आजी-आजोबांना बघितले नव्हते....बऱ्याच वर्षांपासून बाबांना बघितले नव्हते....आई अनेक मैलांवर दूर राहत होती...तरीही हिचे धैर्य खचले नव्हते.  मी दहावीची परीक्षा देत होतो त्यावेळी 'बुश' ने अमेरिकन सैन्य इराकला पाठवले होते. आता मी दहावी झाल्याला सात वर्ष झाली. सात वर्षांपासून तिला आपल्या बाबांना बघता आलं नव्हतं. ' आपण आपल्या बाबांना परत कधी बघू का' असा विचार तर तिच्या मनात येत नसेल ना .....जाऊ दे , मी हा विचार करणंच सोडून दिलं!
त्यानंतर स्टेसी अधून-मधून भेटायची...कधी लायब्ररीत तर कधी खायच्या ठिकाणी.थोडं बोलणं होयचं.मी नंतर भारतात कधी जाणार ह्याची मात्र ती आवर्जून चौकशी करायची. कधी कधी आई-वडिलांबद्दल देखील विचारायची. मी अमेरिका सोडताना तिला भेटायची इच्छा होती पण बऱ्याच दिवसांपासून ती काही दिसली नाही. कदाचित ती वर्जिनियाला जाऊ शकली असेल ह्या आनंदात मी भारतात परत आलो. आश्चर्य म्हणजे ती फेसबुक पण वापरात नाही. त्यामुळे तिथे सुद्धा 'contacted ' राहणं अवघडच!
परवा कुठेतरी पेपरात वाचले की अमेरिकन सरकार हळू-हळू इराक आणि अफ्घानिस्तानातून  सैन्य कमी करणार आहे. लगेच स्टेसीची आठवण झाली. तिला तिचे बाबा भेटू देत ह्याची देवाकडे प्रार्थना केली. माझ्यापेक्षा वयाने लहान आणि डिग्रीने देखील लहान असूनसुद्धा कमालीचे धैर्य शिकवणारी माझी ही मैत्रीण तिच्या परिवारासकट खुश राहो अशीच अशा व्यक्त करतो. बाकी मिनटा-मिनटाला बदलणाऱ्या ह्या जगात आशाच व्यक्त करू शकतो आपण!
आपली  भारतीय संस्कृतीच  सर्वश्रेष्ठ आहे असं मानणाऱ्या लोकांची संख्या काही कमी  नाही. पण शेवटी देश कुठलाही असो,धर्म कुठलाही असो, सामान्य माणूस हा सारखाच! आपल्याकडे मूल झालं की स्त्री आपल्या आई-वडिलांकडे  जाते.....इथे फरक एवढाच सूक्ष्म की आई-वडील ( स्टेसी चे आजी-आजोबा) आपल्या मुलीकडे राहायला आले होते!

Image Credits: http://www.protodepot.com/archive/2008_01_01_archive.html

Monday, February 27, 2012

एक संवाद आणि WTF???

गेल्या गुरुवारी मी कामावरून येताना गाडीची टाकी पार रिकामी झाली होती. घरी पोहोचतोय की नाही हा doubt. कसा-बसा घरापर्यंत आलो. मी ज्या कॉलनीत राहतो, त्याच्या अगदी दारातच एक पेट्रोलपंप (गॅस-स्टेशन) आहे. पेट्रोल भरायचे लक्षात नाही, तसाच घरी गेलो. नंतर मित्रासोबत बाहेर चाललो होतो तेव्हा पहिला पेट्रोलपंपाला थांबलो. कार्ड स्वाईप केलं. आणि पेट्रोल भरायला सुरुवात केली. इथे पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे. इथे जसं पेट्रोलला गॅस म्हणतात, तसंच मापायला सुद्धा लिटरच्या ऐवजी गॅलन हे एकक वापरतात. एका गॅलनला $3.39 असा रेट होता. माझ्या गाडीची टाकी आहे 10 गॅलन. माझ्या अंदाजानुसार काटा कितीही खाली गेला तरी अंदाजे पाव गॅलन पेट्रोल तरी तळाला असायला हवे. म्हणजे जेमतेम पावणे दहा गॅलन पेट्रोल बसायला हवे. पंपाचा काटा मात्र चक्क 10.79 वर जाऊन थांबला आणि मग कट-ऑफ झाला. माझ्या लेखी जे जेमतेम $30-32 मध्ये उरकायला हवे, त्यासाठी चक्क $37 गेले. तेव्हा गडबडीत होतो म्हणून लगेच गाडीत बसलो आणि निघालो. काल घरी जाताना पेट्रोल परत सगळं संपलं होतं. परत त्याच पेट्रोलपंपावर थांबलो. विचार होता - आज पण तसंच झालं तर राडाच करायचा. रविवार सकाळ असल्याने गर्दी तुरळक होती. मागच्या वेळेचा पंप मात्र नेमका यावेळी बिझी होता म्हणून दुसऱ्या पंपावर कार्ड स्वाईप केलं. पेट्रोल भरलं. पंप व्यवस्थित 9.79 भरून झाल्यावर बंद झाला. चार दिवसांत पेट्रोलची किंमत पण वाढून $3.53 झालेली होती. $35.18 झाले. मग मी आत गेलो.

काउंटरवर नेहमीची एक (हरामखोर) कृष्णवर्णीय बाई होती. 'झालं ना पेट्रोल भरून, मग आत यायचं काय काम?' असे भाव चेहऱ्यावर ठेवून तिने मला Good Morning केलं. मी पण मग तिला 'माझ्या कष्टाच्या पैशाने भरतो पेट्रोल, तुझ्या बापाच्या पैशाने नाही' अशा attitude मध्ये तिला प्रतिसाद देत Good Morning केलं. आणि इथून पुढे धमाल सुरु झाली.

मी : (एका पंपाकडे बोट दाखवून) तो पंप नवा लावलाय काय?
ती : लावला असेल, माझं काही बाहेर लक्ष नसतं.
मी : अरे काउंटरवर बसते, बाहेर अख्खा पंप खोदून काढला, त्याच्या जागी दुसरा बसवला - आणि तुझं लक्ष नाही?
ती : तुझं काय काम आहे?
मी : मला त्या पंपाबद्दल तक्रार करायची आहे.
ती : माझ्याकडे?
मी : तू काम करतेस ना इकडे?
ती : हो, पण मी थोडीच तो पंप बदललाय?
मी : (वैतागून) ठीक आहे मग माझा एक मेसेज आहे तो तुझ्या manager ला दे.
ती : ठीक आहे, तिला मी विचारते तो पंप कुणी बदललाय ते.
मी : अरे तो पंप कुणी बदललाय त्याच्याशी मला काय देणं-घेणं आहे?
ती : आता तर विचारत होतास की पंप कुणी बदललाय? म्हणून बोलले. तुझा अजून काही मेसेज आहे काय?
मी : तिला सांग त्या पंपला recalibration ची गरज आहे.
ती : (घंटा कळलं नाही, पण उगाच) काही गरज नाही त्याला.
मी : मी चार दिवसांपूर्वी इथे गॅस भरायला थांबलो होतो. त्यावेळी माझी टाकी पूर्ण रिकामी होती. माझ्या अंदाजानुसार जेमतेम पावणे-दहा गॅलन गॅस गाडीत बसायला पाहिजे होता. त्या पंपावर मी गाडी लावली आणि गॅस भरला. त्या पंपात काहीतरी गडबड आहे. कारण त्या पंपाच्या हिशोबाने मी तब्बल 10.79 गॅलन गॅस भरला.
ती : मग?
मी : इतका गॅस माझ्या गाडीत बसणे शक्य नाही. माझे टाकीच मुळात फक्त 10 गॅलनची आहे. उरलेला गॅस मी कसा भरू शकतो? जेमतेम $30-32 मध्ये उरकायला हवे, त्यासाठी चक्क $37 गेले.
ती : आज किती झाले तुझे?
मी : सुमारे $35 झाले.
ती : हे बघ. गॅसची प्राईज रोज बदलत असते. चार दिवसांपूर्वी गॅस कमी होता, त्यामुळे तू जास्त भरला असशील. आज गॅसची प्राईज जास्त आहे, म्हणून तू कमी भरलास.
मी : अरे भले प्राईज बदलेल. टाकीची quantity कशी बदलेल? आज सुद्धा माझी टाकी तितकीच रिकामी आहे, जितकी त्या दिवशी होती. आणि माझी टाकी फक्त 10 गॅलनचीच आहे.
ती : हं...तुला मोठी टाकी बसवून घ्यायला पाहिजे गाडीला. इतक्याश्या गॅसमध्ये तू किती अंतर जात असशील? म्हणून तुला दर चार-चार दिवसांनी गॅस भरायला यावं लागतं.
मी : अरे माझ्या टाकीचं सोड. तुझ्या पंपात प्रॉब्लेम आहे. तू तुझ्या manager ला सांग की त्याला recalibration ची गरज आहे.
ती : पंप व्यवस्थित आहे. नवाकोरा पंप. त्यात काय प्रॉब्लेम असणार आहे?
मी : त्याला tune-up ची गरज आहे.
ती : ओह.. tune-up चा प्रॉब्लेम आहे तर.... तू एक काम कर, तू उद्या ये. माझा boyfriend गाडीच्या tune-up चं काम करतो. मी त्याला सांगते तुझ्या गाडीचं tune-up करायचं आहे म्हणून. स्वस्तात करून देईल तो.
(माझं डोकं सटकत चाललं होतं)
मी : माझ्या गाडीचा काही प्रॉब्लेम नाही आहे सांगतोय तर. च्यायला, जेमतेम 10 गॅलन मध्ये माझी गाडी 400-420 मैलांपेक्षा जास्त चालते.
ती : बापरे! इतकी? तरी तुला तक्रार आहे? तुझ्याजागी मी असते तर किती खुश झाले असते.
मी : (कपाळावर हात मारत) तुला कळत कसं नाहीये? मी माझ्या गाडीबद्दल बोलतच नाहीये. तुझा पंप खराब आहे त्याबद्दल तक्रार करतोय.
ती : पंप कसा खराब असेल? आता तर नवीन लावलाय. जुनावाला खराब झाला होता - तो बदलून हा लावलाय.
मी : नवीन पंपाला recalibration करायला लागतं. ते या पंपाचे केलेले नाहीये बहुतेक. म्हणून हा गॅस बरोबर मोजत नाहीये.
ती : नसेल. काही कल्पना नाही. पण यात तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे?

मी कपाळावर हात मारला. वाटलं, झक मारली हिच्या नादी लागलो ते. कडाक्याच्या थंडीत सकाळ-सकाळी काय अवदसा सुचली आणि हिच्याकडे आलो असं झालं. तिला बोललो - "काही प्रॉब्लेम नाही आहे माझा. माझी चूक झाली. मी हिशोबात काहीतरी चूक केली गॅस भरताना, आता माझ्या ती लक्षात आली. सोड, जाऊ दे."

बाहेर आलो. ती काचेतून माझ्याकडे 'सकाळ-सकाळी कसली लोकं येतात?' या आविर्भावाने पाहत होती.

मी गाडीत बसलो आणि निघालो. आणि डोक्यात तीनच शब्द (सगळ्या प्रश्न चिन्हांसकट) परत परत घुमायला लागले - WHAT THE FUCK?????

वैभव गायकवाड

Tuesday, February 21, 2012

"CLASS" (शिकवणी)

कालच 'शाळा' पाहिला. अपेक्षांवर खरा उतरला नाही पण त्यानंतर झालेल्या चर्चेमूळे आणि 'इनर सर्कल ' मधील मित्रांनी उद्युक्त केल्याने बरेच दिवसांनी हा लेख लिहायला घेतला. चित्रपटात देशमाने गुरुजींचा 'क्लास' पाहिला आणि मग विचारचक्र काही केल्या थांबेना.

'क्लास' हा आपल्या जीवनाचा किती अविभाज्य घटक झाला आहे हे मला काल खऱ्या अर्थाने उमगले. ह्या विषयावर मी आधी कधीच गंभीरपणे विचार केला नाही याचं मला अजूनही आश्चर्य वाटतं. पहिली दुसरीत असताना कधीतरी कोणत्या एका ताईकडे 'शिकवणी'ला गेल्याचे स्मरते. आता त्यावेळी तिने काही शिकवला वैगेरे नाही म्हणा, आणि मी पण तिकडे जाऊन नुसता गृहपाठच करायचो. मला सतत वाटायचं की घरीबसून सुद्धा हेच करायचं तर तिकडे कशाला जायचं. सुदैवाने मला हे लवकर सूचल्याने पुढची ४-५ वर्षे तरी मी 'क्लास' ह्या संकल्पनेपासून दूर राहिलो. सातवी असताना मात्र आमच्या आईसाहेबांच्या मैत्रिणीने 'क्लास'चे 'महत्व' पटवून दिल्याने मला जबरदस्ती 'क्लास'ला जावे लागले. माझी शाळा दुपार अधिवेशनाची असल्यामुळे मी आरामात ९ वाजता उठत असे , पण ह्या 'क्लास'ने माझ्या साखरझोपेतल्या स्वप्नांना सुरुंग लावला. मला अजूनही आठवतं की आठ , सव्वा आठच्या दरम्यान मी 'क्लास'मध्येच डुलक्या घ्यायला लागायचो.

एक गंमत सांगतो. आमच्या शाळेत एक सर होते. इथे नाव सांगत नाही पण त्यांच्याकडे जाणार्‍या जवळ जवळ प्रत्येक विद्यार्थ्याला गणितात पूर्ण गुण मिळायचे. त्यामुळे त्यांचा 'क्लास' एकदम हाऊसफूल. मला काही त्यांचा 'क्लास' लावण्यात रस नव्हता कारण त्यांचा घर माझ्या घरापासून बराच लांब होतं. मी नेहमी विचार करायचो की मी एवढा प्रयत्न करून सुद्धा मला गणितात कधीच पूर्ण गुण मिळत का नाहीत? एकदा त्या सरांच्या 'क्लास'मधल्या एका मित्राचा तीन दिवस पिच्छा पुरवाल्यानंतर ह्या महाभगांनी मला त्यांचा 'सीक्रेट' सांगितलं. तो म्हणे की सर म्हणतात," देवाच्या कृपेने हे उदाहरण परीक्षेत येऊ देत", मग आपण समजून जायचं की ते नक्की येणार. गणिताच्या पेपरला पाठांतर करून जायचा अशी कबुली पण दिली. तर शाळेतल्या सरांच्या 'क्लास'चं हे एकंदरीत स्वरूप !

आठवीत असताना आमच्या वर्गाची सेमी इंग्रजी माधम्यासाठी निवड झाल्याने आमच्या आईसाहेबांच टेन्शन अजून वाढलं आणि मग मला 'क्लास' लावण्याखेरीज गत्यंतर उरलं नाही. यावेळी 'क्लास' आमच्या वर्गशिक्षकांचाच. म्हणजे सकाळ संध्याकाळ त्यांचं दोनदा दर्शन ! चाळीतल्या एका 'वन प्लस वन' खोलीच्या वरच्या मजल्यावर आमचा हा 'क्लास' चालायचा. बसायला बाकंसुद्धा नव्हती. जमिनीवरच मांडी घालून बसावं लागायचं. शिवाय वर पत्रे असल्याने भयंकर उकडत असे. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय इंग्रजीतून होते पण ह्या 'क्लास'मध्ये मी फक्त मराठीचं इंगजी भाषांतरच शिकत होतो. मला तिकडे शिकण्यात काही रस नव्हता. मी माझी नवी कोरी 'BSA Trailblazer' सायकल घेऊन कुणी 'शिरोडकर' भेटते का याचाच शोध घ्यायचो. :D नववी , दहावीला इयत्तेबरोबरच 'क्लास'चा 'दर्जा' वाढला आणि 'एन.जी.के.' क्लासेस मध्ये माझं अॅडमिशन झालं. आता मी शाळेबरोबर 'क्लास'मध्ये पण बाकावरच बसत होतो मात्र शालान्त परीक्षेच्या निकालात काही जास्त फरक पडला नाही.

अकरावी बारावी म्हणेज ह्या क्लासेसचा सूळसूळाट ! प्रत्येक विषयासाठी वेगळा 'क्लास'. त्यात आय. आय. टी. , एन. डी. ए. ह्यांच्यासाठीसुद्धा वेगळा 'क्लास'. बहुतेकजण आपला सगळा वेळ ह्या क्लासेस मध्येच घालवतात. मी मात्र अकरावी 'rest year ' म्हणून 'क्लास' न लावण्याचा निर्णय घेतला होता पण आता आईची जागा बाबांनी घेतली आणि अकरावीचे वर्ष महत्वाचे कसे याची पारायणे झाली. मग मी असाच एक साधा 'क्लास' लावला. इंजिनिअर , डॉक्टर वैगेरे मंडळींचा तो 'पार्ट टाइम' व्यवसाय होता. त्याच काळात 'चाटे' क्लासेस चे प्रकरण खूप गाजले. अवघ्या महाराष्ट्रात त्यांचे वर्ग चालायचे. मुंबईत तर दर दुसऱ्या स्थानकावर यांचा 'क्लास'. पण नंतर आयकर विभागाची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडली आणि 'चाटे'ला त्यांनी चाटून पुसून खाल्लं. :D बारावीत असताना 'अग्रवाल क्लासेस' ला मला अॅडमिशन मिळालं नाही म्हणून 'सिन्हाल क्लासेस'ला घ्यावं लागलं. ह्या 'अग्रवाल क्लासेस'ची पण अजब तऱ्हा आहे. दहावीचा निकाल लागला रे लागला की त्याच दिवशी ह्यांचे अॅडमिशन्स फुल ! आणि गंमत म्हणजे इथे जे शिक्षक शिकवतात तेच इतरही क्लासेस मध्ये जाऊन शिकवतात. त्यामुळे 'अग्रवाल क्लासेस'ची एवढी 'हवा' का ? हा अजूनही न उलगडलेला प्रश्न आहे. तर बारावीचे हे क्लास म्हणजे सलग ३ महिने दर दिवशी ७-८ तासांचा तुरुंगवास. दहा बाय दहा च्या खोलीत ३ ए.सी. लावलेले आणि वरून फिजिक्स ,केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स. थंडीने अक्षरशः कुल्फी व्हायची. हे क्लास म्हणजे मला कोंडवाडा वाटतो. मेंढरांना आत बंद करायचं आणि वेळ संपली की सोडून द्यायचं.

एकदाची बारावी झाली आणि म्हणालो सुटलो ह्या 'क्लास'च्या जाळ्यातून एकदाच तर इन्जिनिअरिन्ग 'दत्त' म्हणून समोर उभी! इन्जिनिअरिन्गसाठीपण क्लासेस असतात हे ऐकून तर धक्काच बसला होता पण मग 'विद्यालंकार क्लासेस' हे शब्द लवकरच परवलीचे झाले. त्यात थ्री डे क्रॅश कोर्स हा सगळ्यांचाच आवडीचा ! पूर्ण टर्म टंगळमंगळ करून ३ दिवसात अभ्यासक्रम पूर्ण. माझे काही महाभाग मित्र ह्या कोर्सेस साठी घरून पैसे घ्यायचे आणि पुढचे ३ दिवस कॉलेजच्या वाचनालयात बसून अभ्यास करायचे. मग ह्याच पैश्यांतून परीक्षा संपल्याच्या आनंदाच्या आणि निकालाच्या दिवशी 'K T'च्या 'गम'मध्ये पार्ट्या ! T.E. , B.E. मध्ये परदेशात जाण्याची तयारी चालू झाली आणि त्यासाठी GRE , TOEFL साठी पण 'क्लास' लावणे आलेच. 'मेडिकल'चे विद्यार्थी आमच्यापेक्षा थोडे अधिक नशीबवान कारण 'क्लास'शी त्यांचा संबंध बारावीनंतरच तुटतो . थोडक्यात काय तर 'क्लास' हा आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे.

काहीही असो पण एवढ्या वर्षांत 'क्लास'ला जाऊन काहीच उपयोग झाला नाही असं मात्र मी म्हणणार नाही. आठवीतल्या 'क्लास' मध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या पाटील सरांनी इंग्रजीचं व्याकरण इतकं चांगलं शिकवलं की आजतागायत मला ते परत शिकण्याची कधीच गरज भासली नाही. पुढे दहावीत असताना संस्कृत व्याकरणासाठी मी एक पंधरा दिवसांची व्याख्यानमाला लावली होती. आमच्याच शाळेतला निलेश वाकडे नावाचा एक माजी विद्यार्थी व्याकरण शिकवायचा. त्याने शिकवलेलं क वि धा वि , क भू धा वि आणि इतरही बऱ्याच गोष्टी आजही लक्षात आहेत. कधी कधी मी विचार करतो की ह्या दोनच शिक्षकांसाठी मी क्लास लावून एवढी वर्षे फुकट घालवली का? शिकवण्या , क्लासेस यांची खरच गरज होती का ? ह्या प्रश्नाने द्विधा मनस्थितीत आणून सोडलाय मला .

बोकिलांची 'शाळा' वाचली तेव्हा ७० च्या दशकात पण 'क्लास' अस्तित्वात होते ह्या गोष्टीचा नवल वाटलं. माझ्या मते ही संकल्पना पूर्वापार चालत आली आहे पण गेल्या २० एक वर्षात ती जास्त प्रभावी झाली आहे आणि आताच्या युगात एक फॅशन झाली आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. हल्ली मुलं नर्सरीमध्ये गेली की लगेच त्यांचे आईबाप त्यांना 'क्लास'ला घालतात. आपला मुलगा इतक्या क्लासेसना जातो असे बढाई मारणारे पालक दिसले की त्यांची मला खरच कीव येते. 'क्लास'ला जाणे योग्य की अयोग्य हे ज्याचं त्याने ठरवावं पण ही 'क्लास' संस्कृती अशीच फोफावत राहिली तर नजीकच्या काळात 'शाळा' ही संकल्पना फक्त नाममात्र उरेल आणि तसं होणं म्हणजे आपल्या शिक्षणपद्धतीच्या मुळावरच घाव घालण्यासारखे होईल. आपल्या पिढीने त्यादृष्टीने प्रयत्न करावेत असं मला मनापासून वाटतं. 'क्लास'ला शाळेचा पर्याय म्हणून न पाहता पुरवणी वर्ग म्हणूनच बघयला शिकवलं पाहिजे. जर असं झालं तर 'शाळा' कादंबरी वाचून आपण आपली शाळा जशी 'miss' करतो तशीच भावी पिढी सुद्धा त्यांची शाळा 'miss' करू शकेल!

Monday, February 20, 2012

तो आणि ती…


नमस्कार,

मागे एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. बरीच जुनी मंडळी भेटली. अर्थात रोझीदेखील भेटली. ही सगळी माझ्या ज्युनियर कॉलेजमधली मंडळी. मस्त गप्पा रंगल्या होत्या. त्या सुरु असताना अचानक ‘तो’ भेटला. बायकोसोबत आला होता. माझ्याशी गप्पा मारता मारता त्याची नजर कुणालातरी शोधात होती. हे माझे लगेच लक्षात आले. तितक्यात ‘ती’ आली आणि त्याचा चेहरा खुलला. आणि तीसुद्धा खुश झाली. मी तिला हाय-हेल्लो करून बाकी मित्रांकडे गेलो. ते दोघे भेटले आणि बोलत उभे राहिले. तिचा नवरा आला मागून. तो ड्रिंक घेऊन बाजूला उभा राहिला तर मित्राची बायको कुठे गायब झाली ते कळत नव्हते. नंतर कळाले की तीसुद्धा ‘ग्लास’ घेऊन उभी होती. तितक्यात आपला मैतर रम्या (‘रम’ ह्या शब्दाशी जोडलेला कुठलाही शब्द आपल्याला आवडतो. मग तो माणूस का असेना. लोळ) आला आणि म्हटला,’साले हे दोघे आजपण टाका भिडवून आहेत. आव्या, तुला माहीत असेल ना की यांचे नक्की काय आहे सुरु?’ आता मला दुसऱ्यांच्या अशा लफड्यात पाडण्यात काहीही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे रम्याला नुसती स्माईल दिली. तोसुद्धा मला सगळे काही माहीत आहे असा विचार करून हसू लागला. दोघांचीही लग्ने झालेली. फरक एवढाच की लग्न वेगवेगळ्या लोकांशी झाले होते आणि यांचे प्रेम आताशी उतू आलेले. कुठेही भेटले की हे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून उभे. इथेही स्थिती काही वेगळी नव्हती. त्यांच्या नवरा-बायको या लोकांना काय वाटते हे नक्की माहीत नाही. उगीच मला दहा प्रश्न विचारतील म्हणून मी त्यांच्या (त्या दोघांच्या नवरा-बायकोच्या) वाटेला जात नाही. नाही म्हणायला त्या दोघांनी माझ्याशी मैत्री करायचा प्रयत्न केलेला. पण नसती कटकट नको म्हणून मी त्यांना फाट्यावर मारलेला. असो.

हे दोघे एका बिल्डिंगमध्ये राहणारे. ती वरच्या माळ्यावर तर हा खालच्या माळ्यावर. त्याला मी ओळखतो ते नववीपासून कारण तोदेखील माझ्याच क्लासला होता. तो काही माझा फार ग्रेट मित्र नव्हता पण त्याला वाटायचे की मी त्याचा फार चांगला मित्र आहे. तो चांगलाच पोऱ्या आहे याबद्दल वादच नाही. पण मला मात्र ‘बोर’ वाटायचा. का माहीत नाही पण आमची मैत्री म्हणजे निदान माझ्याकडून तरी हाय आणि बायच्या पलीकडे कधी गेलीच नाही. पण आम्ही भेटायचो हे निश्चित. दहावी पास झाल्यावर आम्ही नेमके एकाच कॉलेजमध्ये आलो. आणि मग आमच्या गाठीभेटी वाढल्या. तीदेखील माझ्या कॉलेजला होती. तिने फ्रेंच घेल्याने ती दुसऱ्या वर्गात तर आम्ही मराठीचे परमभक्त असल्याने एकाच वर्गात. फ्रेंच शिकवताना ‘फ्रेंच किस’ शिकवतात का असा उगीच प्रश्न मी तिला विचारला होता. तो सॉलिड भडकलेला. अर्थात त्यांचे तसले काही ‘ऑफिशियली’ नसल्याने मी त्याला उडवून लावलेला. सोमय्यामधला एक चांगला टाईमपास होता. इंजिनीयरिंग कॉलेजसमोर एक टपरी होती. तिथे मस्त गरम टोमॅटो सूप मिळायचे. तिथे गप्पा रंगवायला मजा यायची. तिथेच आम्ही दोघे बसलो होतो. हा बोलता बोलता मला म्हणाला,’तुला ती ** माहिती आहे ना?’ मी ‘हो माहिती आहे’ असे उत्तर दिले. (नाव मुद्दाम लिहीत नाही. च्यायला मागे रोझीचे नाव लिहिले तर मला कॉलेजमधल्या शंभरएक पोरांनी तिच्याबद्दल विचारले होते. नसती कटकट नको म्हणून रोझीला फेसबुकवरून अजून तात्पुरते हलवले आहे.) ‘मस्त आहे ना रे पोरगी?’ त्याला ती आवडते मला माहीत होते. पण तोदेखील सहजासहजी कबूल करणाऱ्यातला नव्हताच मुळी. मी उगीच तिची तारीफ करू लागलो आणि मग पुढे काही बोलणार तितक्यात तोच बोलला. ‘आव्या, आपल्याला ती आवडते यार!’ ‘मग मी काय करू?’ माझा त्याला थंड प्रश्न. ‘काय करू नको बे? ऐक तर.’ मग तो त्याची स्वप्ने रंगवू लागला. नंतर नंतर डोक्यात जायचा मग मी त्याला टाळायचो. बरे तिच्याशी बऱ्यापैकी मैत्री होती. यांच्या लफड्यात आपला ‘कबूतर’ म्हणून उपयोग नको. म्हणून मी दोघांनाही टाळायचो. मला मैतर फार होते. त्यात हे कशाला गळ्यात बांधून घ्या हा आपला साधा सोपा विचार.

बारावीला आल्यानंतर काही फार वेळ आम्ही भेटलोच नाही. सरळ भेटलो ते इंजिनियरिंगच्या प्रवेशाला. व्हीजेटीआयला. इकडे ‘राउंड’ सुरु असायचे. त्यावेळी आयटीचा मोठा फुगा आला होता. सगळे तो फुगा कसा वर तरंगतोय आणि आपण कसे नंतर हवेत जाणार याचे स्वप्न सगळे पहायचे. अर्थात मला आयटीबद्दल काही खास प्रेम नव्हते. पहिल्याच फटक्यात यूडीसीटीमध्ये प्रवेश मिळाल्याने मी प्रवेशप्रक्रियेतून तसा ‘बाद’च झालेलो. हे दोघेजण तिथे ‘जोडी’ने यायचे पण तो त्याच्या मैत्रिणीबरोबर आणि ती त्याच्या मित्राबरोबर. आता हे दोघे त्यांचे कोण होते हे मला माहीत नव्हते. पण हळूहळू कळाले की हे एकमेकांना जळवायला जोडीने यायचे. मी जायचो एका गुज्जू मित्राबरोबर. तो उतावीळ आणि थोडासा मंद प्राणी. त्याला हे लफडे काही कळायचे नाही. अर्थात मलादेखील कुठे कळाले होते म्हणा. पण माझा अंदाज बरोबर निघाला. त्याला प्रवेश मिळाला व्हीजेटीआयमध्ये प्रोडक्शनला तर ती गेली विवेकानंद आयटीला. हा मला नेहमीच भेटू लागला. कारण आम्ही एकाच ट्रेनने जायचो. तेव्हा मला तो बोलला. ‘अरे मलासुद्धा ती आवडते आणि तिलाही मी. पण लगेच एकमेकांना प्रपोज करण्यात काय अर्थ आहे. थोडे दिवस मजा करू. एकमेकांना लांबूनच पाहू. आंबे चोरण्यात जी मजा आहे ती मागून खाण्यात नाही. बरोबर की नाही?’ मी मुंडी हलवली आणि ‘आंबे’ या शब्दावर जोर देत फिदीफिदी हसायला लागलो. ‘साल्या आव्या, असे काय बोलायचे नाही हा? आपल्याला जाम आवडते ती.’ ‘बर्र बाबा..’ असे म्हणून मी पुढे काही कॉमेंट करायचे टाळले.

एकदा व्हीजेटीआयच्या कॅन्टीनमध्ये गेलेलो. तिथे हा भेटलाच. तीदेखील आलेली. अर्थात कोणालातरी घेऊन. असे बैल पोरींना नेहमी लागतात. वर्कशॉपमधले जॉब करून द्यायला. जर्नल संपवून द्यायला. परीक्षेच्या आधी झेरॉक्स गोळा करून द्यायला आणि बरेच काही. हे बैलदेखील इमानइतबारीत सगळे करत असतात. त्यांचे काय बिघडलेले असतं ते काय माहीत नाही. पण अशा पोरांना आपण पोरीबरोबर असतो हे दाखवायला आवडते असे बऱ्याचदा वाटते. त्यात मग त्यांना आपण कसे ‘कूल ड्यूड’ असे उगीच वाटते. जाऊ दे. तर तो बैल तिच्याबरोबर होता. गप्पा मारता मारता ह्या लोकांनी पैज लावली की जास्त समोसे कोण खाणार? अर्थात मी असल्या नादाला लागत नाही. कारण आपली उगीच मारून घेण्यात काही अर्थ नसतो. मी आधीच ‘आय क्वीट’ म्हणून मोकळा झालो. हे लोक लागले खायला. तिने चक्क १२ समोसे खाल्ले आणि त्यावर लस्सी. आता व्हायचे ते झाले. दारू पिऊन ओकतात तशी ती भडाभडा ओकली. तीदेखील त्या बैलाच्या अंगावर. तो मुर्ख प्राणी मात्र काही झालेच नाही असे दाखवून तिला समजावू लागला. मी तिला शांतपणे बोललो..’सकाळी शेपू खाल्लेली का? नाही दिसते तरी तसेच आहे.’ आणि हसू लागलो. ती मला बडबडायच्या स्थितीत नव्हतीच. तो मात्र माझ्यावर वैतागला. मी त्याला बोललो. ‘अरे तो बैल बरा. तू नुसता बघत राहिलास जेव्हा तिला गरज होती. तो बैल बघ. आपलीच गाय असल्यासारखा शेपटी हलवू लागला. तू एकतर फेकतोस नाहीतर ती तुला चुत्या बनवते.’ तो काहीच न बोलता परत गेला. दुसऱ्या दिवशी ट्रेनमध्ये भेटला नाही. सरळ पुढच्या आठवड्यात भेटला. मला म्हटला,’हे बघ. तिने लिहिलेली पत्रे. मी फेकत नव्हतो.’ मी बोललो,’अरे मला काय करायचे आहे. तुम्ही तुमचे बघा काय ते. मला वाटले ते बोललो.’ भेंडी कधी तिने मराठीचा निबंध लिहिला नसेल पण पत्रे सॉलिड होती. असो. त्यांचे हे असे चाळे सुरूच होते. त्यांना ओळखणारे आम्ही काही कॉमन मित्र त्यांचा विषय निघाला की खो-खो हसायचो. यांचे काय होणार का माहीत असे म्हणायचो. एकदा त्याचा एक बालपणीचा मित्र भेटला. तो सहज म्हटला,’अरे त्याला समजाव. ती त्याला मुर्ख बनवतेय आणि हा तरी तिथेच आहे.’ सेम गोष्ट मला तिची मैत्रीण बोलली. मी मनात बोललो की काय चालले आहे हे मला तरी नीट माहीत आहे. पण हे सगळे खरेच आहे हेदेखील कशावरून असा विचार मी करू लागलो. आणि मला या सगळ्यांचीच कीव आली.

इंजिनियरिंग संपल्यावर ती मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत लागली. भेंडी ह्यानेदेखील चांगला मिळालेला जॉब सोडून तीच सॉफ्टवेअर कंपनी जॉईन केली. थोडा विचार केला की आता हे एकत्र येतील. मध्ये २-३ वर्षे त्यांचा नी माझा फार काही संबंध नव्हता. फेसबुकवर अकाउंट बनवताना जुना आय-डी दिलेला. त्यात ह्यालादेखील इन्विटेशन गेले आणि आम्ही अचानक भेटलो. मग दोन तीन वर्षात काय काय झाले याची उजळणी झाली. तेव्हा कळाले की या दोघांचेही लग्न झाले. तेदेखील दुसऱ्याशी. मला धक्का थोडासाच बसला. कारण हे असे केल्यावर असेच होईल असा माझा फार पूर्वीपासून कयास होता. पण हे असे का झाले असे कसे त्यांना विचारायचे म्हणून मी गप्प बसलो. मी कितीही हरामखोर असलो तरी थोडा संवेदनशील आहे. जाऊ दे ना आपल्याला काय करायचे म्हणून विषय सोडून दिला. हळूहळू मला काही गोष्टी कळू लागल्या अर्थात हे त्रांगडे जवळून पाहणाऱ्या मोजक्या लोकांपैकी मी एक होतो. त्यामुळे असेल कदाचित तो माझ्याशी आपल्या भावना व्यक्त करू लागला. त्यात कळाले की तिने तिच्या बॉसबरोबर लग्न केले. का तर म्हणे यात दोन फायदे होते. तिला पैसेवाला मिळाला आणि हा तर जवळपास असेलच. ह्याबाबत त्याचे उत्तर असे की, ‘मला तर सहवासच हवा होता. बेडवर काय कुणीही चालेल.’ माझे डोके थोडे गरगरू लागले. तिच्याशी एकदा बोलताना ती सहज म्हणून गेली,’बघ, मी तर एकदम प्रॅक्टिकल मुलगी आहे. (आपल्या भावना नीट समजावून देता आल्या नाहीत कि मग मी ‘प्रॅक्टिकल’ आहे अशी बोंब ठोकायची असते. :D )पैसा आणि प्रेम एकदम मिळत नसेल तर दोन्ही खिशात ठेवता आले पाहिजे. मला असलेला पर्याय मी निवडला. आणि हा त्या परिस्थितीमध्ये सर्वोत्तम होता. तुला काय वाटते?’ ‘मला काय वाटते याचा यात संबंधच काय येतो. हे एवढे सगळे करून तुम्ही दोघे खुश असाल तर माझ्या बापाचे काय जाते? पण तुझा नवरा आणि त्याची बायको खुश आहे का?’ माझे उत्तर. ती अजिबात गोंधळली नाही. ’हे बघ त्याच्या बायकोला असा नवरा हवा होता जो तिला पूर्ण स्वातंत्र्य देईल आणि त्यालासुद्धा अशी बायको हवी होती. आणि माझ्या नवऱ्याबद्दल म्हणशील तर हा माणूस एकदा एवढ्या मोठ्या पोस्टवर पोचला की तिथे त्याच्या संवेदना बोथट झाल्यात. म्हणजे त्याला वेळतरी कुठे असतो. तो त्याच्या जगात मी माझ्या. शिवाय ‘तो’ माझा मित्र असल्याने त्याला काही त्रासदेखील नाही.’ ‘त्याला माहीत आहे की तुमचे असे काही चालले आहे.’ माझा भाबडा प्रश्न. ‘त्याला असलेल्या ‘गरजा’ मी पुरवते. त्यामुळे त्याला फरक पडत नाही. मला हवे असलेले तो मला देऊ शकत नाही. मग मी माझे सुख शोधून काढले आहे. आणि शेवटी यात कुणाचाही तोटा नाही. सगळे खुश आहेत.’ मी निरुत्तर झालो. ‘बोल ना अवि. तुला काय वाटते?’ ‘जर आयुष्यात पण अर्थशास्त्राचे नियम लावायचे असतील तर मग मला काय वाटते हा प्रश्न गौण आहे. कारण या गेममध्ये मी ‘प्यादा’ नाहीच ना. आणि शेवटी आज योग्य वाटणारे कुठलेही शास्त्र उद्या कुचकामी ठरते. महत्वाचे म्हणजे तुम्ही मानसशास्त्राशी खेळत आहात. बहुतेक डोक्यावर आपटल्याशिवाय शुद्धीत येणार नाही. पण तुमच्या निर्णयाला आपला सलाम.’ असे म्हणून मी कल्टी मारलेली. त्याला आता बरेच दिवस झालेले. मध्ये बऱ्याचदा भेटलेलो. पण ही पहिलीच वेळ की ह्या सगळ्यांना एकदमच मी समोरासमोर भेटलेलो. सगळ्यांचेच डोळे भुकेले दिसले. अर्थात कशाचे ते सांगायची गरज आहे का? पण डोळे प्रसन्न नव्हते. हे सगळे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे आहे याची मनोमन खात्री पटली.

पार्टी संपली. तो त्याच्या बायकोसोबत आणि ती तिच्या नवऱ्यासोबत. निघाले. ते दोघे घोडबंदर रोडला राहत असल्याने तुला सोडतो असे म्हणाले. मी बसलो गाडीत. सगळेच दमले होते. मी पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसलेलो. मध्येच गाणे लागले की ….तेरे बारे में सोचा नही था….थोड्या वेळाने …मनाने रुठ्ने के खेल में हम…बिछड जायेंगे ये सोचा नही था…हे कडवे लागले आणि मी मागे पाहिले. तो माझ्या डोळ्याला डोळे भिडवू शकला नाही. तो मला एकदा बोलला होता. ‘आव्या, ती म्हणत होती की तू ब्लॉग लिहितोस. आमची पण कहाणी लिही ना..बघू तरी कसा लिहितोस.’ त्याचा आग्रह. मी फक्त त्यावर हसलो होतो. आता ह्यांच्या गोष्टीमध्ये कोण कुणाला मुर्ख बनवतेय हे तर काही कळत नव्हते. पण सगळेच मात्र खुशीत असल्याचे दाखवत होते. मला काय वाटते किंवा तुम्हाला हे सर्व वाचून काय वाटेल हे माहीत नाही. हा ब्लॉग त्याने वाचला असेल की नाही माहीत नाही पण तिने नक्कीच वाचला असेल. कारण ती नेहमीच प्रत्येक ब्लॉगवर तिची प्रतिक्रिया कळवत असते. बघू आता तिचा काय प्रतिसाद येतो ते. पण ह्या सगळ्यामुळे कुणाला काय फरक पडतो? हे सगळे लिहिताना आयुष्यात कुठलाही निर्णय हा चूक किंवा बरोबर नसतो पण घेतलेला निर्णय बरोबर आहे हे सिध्द करावे लागते ही ओळ आठवली एवढेच काय ते!

अविनाश.

(अवांतर: ‘लोळ’ हा शब्द टायपिंग करताना झालेली चूक नसून ‘LOL’ आणि ‘ROFL’ ह्या दोन इंग्लिश शब्दांचे एकत्रीकरण करून शोधलेला क्रांतिकारक (लोळ) मराठी शब्द आहे. फेसबुकवर मी तो बऱ्याचदा वापरला आहे. ब्लॉगवर प्रथमच वापरत आहे. )

Tuesday, February 7, 2012

कल फिर जीतना है!नमस्कार,

आयटीमध्ये काम करणाऱ्या एका मित्राला मी फोन लावला आणि बोललो,’अरे, जरा घरी येऊन जा. तुझ्याशी थोडे बोलायचे आहे.’ सकाळी ऑफिसला प्रोग्राम (‘बसायचा’ नव्हे! :D) आहे, तो आटपून संध्याकाळी येतो असे बोलला. आल्यावर जरा वैतागलेला दिसला. मी विचारले,’का रे, काय झाले?’ ‘काय नाय रे, कुठल्याशा मोटिवेशन प्रोग्रामला बोलावला होता. आयला, नट्टापट्टा केलेली एक फटाका बाई काय सांगत होती काय माहीत? सगळे डोक्यावरून गेले. कंपनी या लोकांना भरभरून पैसे देते. याचा फायदा मलातरी शून्य होतो.’ मी बोललो,’असे काय असते रे?’ ‘काही नसते रे? उगीच कायतरी शॉट देतात. नुसत्या मोठ्या बाता मारतात. वस्तुस्थिती सोडून काहीही बरळतात. दिवस घालवला फुकट!’ मी विचार केला की मोटिवेशनच्या नावाखाली जे काही होते त्यानंतर जर कुणी असे वैतागत असेल तर काय फायदा? अर्थात काही लोकांना याचा फायदा होतही असेल. तितक्यात मित्र म्हटला,’पण आव्या, मोटिवेशनची गरज आहे रे सध्या? तू साला नेहमी हसत खिदळत असतोस. मला काहीतरी सल्ला दे. मी पुढच्या आठवड्यात भेटतो.’ नंतर मी विचार करू लागलो आणि टीव्ही सुरु करताच मला त्याचे उत्तर सापडले. एक जाहिरात लागली होती. हम में है हिरो!

यावेळचा वाढदिवस काही जवळच्या मित्रांसोबत गोव्यात साजरा केला. १५ ऑगस्टलाही तिथेच होतो. सकाळी रूममधून बाहेर पडायच्या आधी रेहमानच्या आवाजातले एक गाणे धुसरसे ऐकले. हम में है हिरो...परत आल्यावर ते गाणे तोंडावर होतेच. मध्ये मोबाईलवर सर्च मारून ह्या गाण्याची पार्श्वभूमी जाणून घेतली होती. तेव्हा कळाले की अरे ही तर जाहिरात आहे. युट्युबवर हे गाणे लावले. गाणे सुरु होते. वर्ल्ड जिम्नॅस्टिक्सची स्पर्धा सुरु आहे. तिचा नंबर येतो. ती आपल्या प्रशिक्षकाकडे पाहते. तो दिलासा देतोय. तिच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे. बाकी स्पर्धक हिला काय येते असा चेहरा करून तिला बघतायत. तिला आपला खडतर ट्रेनिंगचा काळ डोळ्यासमोर दिसतोय. गुरूचा दट्ट्या आठवतोय. आपली मेहनत आठवतेय. पण आता ते सगळे मागे राहिले. आता स्वत:ला सिध्द करून दाखवायचे आहे. ती डोळे मिटते.

रेहमान सुरु होतो. दिल धीरे धीरे धडके आज..होने को है आगाज...

एक तरुण बाईकवरून चाललाय. खडतर पूल येतो. तो थोडा विचार करतो...ओळी उमटतात..सफ़र में चलने का..बढ़ने का...

लहान पोरगा स्टेजवर जायची तयारी करतोय. आपल्या अब्बांना एसएमएस करतोय. I want to do it! तितक्यात त्यांचा फोन येतो. थोडासा भांबावलेला हा आरशात पाहतो आणि स्टेजवर जातो. इतना है हौसला..उतना फासला...मंजिल ने मिल ही जाना है...

एक उमदा सरदार रडतखडत गड चढतोय. त्याच्या मागून चढणारी मुले दणादण पायऱ्या चढत आहेत. त्यांना पाहून ओशाळतो. त्यांना बघत तिथेच थांबतो. हा त्यांना पाहून प्रेरणा घेतो आणि सगळे विसरून दणादण चढायला लागतो. नवरा बायकोला स्कूटी शिकवतोय...रेहमान म्हणतोय...ओ ख्वाबों से...आगे जाना है...

काही पोरे क्रिकेट खेळतायत. गस्तीवर असणारे सैनिक जीपमध्ये विश्रांती घेत आहेत. त्यातला एक पोरगा जोरात फटका मारतो जो जीपवर जाऊन आदळतो. बाकीची पोरे पळून जातात. हा तिथेच उभा राहतो. ते बट मागतात. हा बॉल देतो. टाका बॉल, मी नाही घाबरत...नको तिकडे आमच्या मैदानात गाडी लावतात. असा चेहरा करत आपल्या जागेवर जातो. गाणे पुढे सरकते आहे....हमी से तो उम्मीदे है..हमी से तो दिलासा है....

पायलट असलेली स्त्री, नवरा आणि मुलाचा निरोप घेतेय. आत्मविश्वासाने एकेक पाउल टाकतेय. रेहमान सुरूच...हमी पे है निगाहें भी...हमी पे भरोसा है....

शेवटी एकजण उडी मारतोय...त्याचे पॅराशूट फडकते आणि रेहमान अत्युच्च स्वरात म्हणतो...हम में है हिरो!

ती यशस्वीपणे उड्या मारते. स्टेडियम तिचे कौतुक करतेय. ती अभिमानाने बघते...हम में है हिरो!

बाईकस्वार वाट काढत पुल पार करतो...हम में है हिरो!

अब्बाला एसएमएस करणारा बारक्या स्टेजवर धम्माल नाचतोय. सगळे टाळ्या वाजवत आहेत. ह्याला अब्बांचा फोन येतोय..त्याने खुशीत फोन हातात धरून ठेवलाय....हम में है हिरो!

रडतखडत चढणारा सरदार आता वर पोचलाय आणि आनंदाने वरून दिसणारा निसर्ग अनुभवतोय...तिला बाईक नीट चालवता येतेय...नवऱ्याला ती मागे बसवून घेऊन चाललीय.....हम में है हिरो!

बरे तो बारका सेहवाग सगळ्या सैनिकांनाच घेऊन क्रिकेट खेळतोय. रेहमान गातो...दिल से कहो..है..हम में है हिरो...हम में है हिरो!

तन्मयतेने गाताना रेहमान दिसतो. त्याची ती प्रसन्न देहबोली दिसते. तीदेखील हेच सांगते...हम में है हिरो! गाण्यातून प्रत्येकाला सांगण्यात रेहमान यशस्वी होतो की हम में है हिरो! हर हिंदुस्थानी में एक हिरो है...बरे रेहमानने ऑस्कर मिळवलाय. जगाला भुरळ घातलीय. तो सगळ्या भारतीयांसाठी हिरोच आहे. ही जाहिरात बरेच काही सांगून जाते. अर्थात रेहमानच्या चालीला उत्तम व्हिडीओची साथ..त्यामुळे हे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय ठरते.

अशीच एक अजून जाहिरात. बऱ्याच लोकांना माहीत नसलेली. सातारला शूट झालेली. हेवर्ड सोड्याची..

५:३७ झालेत. अलार्म वाजतो. तो उठतो. त्याच्या खिडकीबाहेर लवकर ‘उठणारी’ लोकल दिसते. तो आंघोळ करतो. तयारी करतो...आज मैं सूरज से पहले उठा...आखिर उस से ज्यादा चमकना है...

गर्दीत बस सुटते. हा बसवर बसून आजचे काम पाहतोय...भीड़-भाड़ में रहकर खो जाना कितना आसान है...फिर तो राह खुद धुंडनी पड़ती है...

बाजूला कुणीतरी ओरडतेय आणि आकाशाला भिडायचं असा विचार करतेय. पण हा वेगळ्याच ‘उंचीवर’ आहे. त्याला पाहून तो ओशाळतो...आसमान तो हर कोई छूना चाहता है...पर...हर किसी के बस में नहीं.....

एका ठिकाणी पोचून तो लिफ्ट मागतोय. आता बाईकवर बसून चाललाय. मागे विशाल पवनचक्क्या आहेत....राहे रुक गयी तो क्या...मंजिल तो नहीं रूकती...

पाऊस पडतोय. हा धावत टपरीवर पोचतो. बघतो तर बूट फाटलेला. गुरांसोबत पुढचा प्रवास...मुश्किलें लाख बरसे...मुस्कुरा के आगे बढ़ना है...और क्या...हौसला नहीं छोड़ना है...

शेवटी पोचतो. कंपाउंडर त्याला थांबण्यास सांगतो. हा बाहेर थांबतो...चाहे कोई कुछ भी कहे...चाहे कितनी भी देर लगे...

रात्र होते. खिसा खराब झालाय कारण शाई गळाली आहे. त्यात फाटलेला बूट आपले अस्तित्व दाखवतोय...मंजिल कितनी भी दूर लगे..बस मुड़कर नहीं देखना है...

डॉक्टर निघालेत. हा प्रसन्न मुद्रेने त्यांना समोर जातो. डॉक्टर त्याची मेहनत एका क्षणात ओळखतो. त्याला आता बोलावतो.

ऑर्डर घेऊनच तो निघतो. आता एसटीमध्ये बसलाय...हार नहीं मानूंगा..ये हौसला बुलंद है...

तो एसटीच्या बाहेर पाहतो. ताजी हवा फुफ्फुसामध्ये भरून घेतोय. कारण उद्या अजून मोठी ‘झेप’ घ्यायची आहे...कल फिर जीतना है..सूरज से पहले उठना है...उस से ज्यादा चमकना है...

जाहिरात संपते. जर ही जाहिरात नीट पाहिली तर बरेच काही सांगून जाते. जेमतेम एका मिनिटाची जाहिरात एवढ्या कमी वेळात मनावर जे काही ठसवून जाते ते बहुतेक कुठेही सापडत नाही.

आपण बऱ्याचशा गोष्टींची उत्तरे आजूबाजूच्या परिस्थितीत न शोधता पुस्तकी छापाच्या दरबारात शोधतो, ती बऱ्याचदा सापडत नाहीत. वेळ एवढा कमी असतो की उगीच वेळ काढून बुवाबाजी करण्यापेक्षा आजूबाजूला नीट डोळसपणे पाहिले तर कुठली गोष्ट तुम्हाला सुंदर वाटून जाईल सांगता येत नाही. ती सहजच मिळणारी प्रेरणा उसाच्या ताज्या रसासारखी आहे. उगीच फ्लेवर मिसळून दिलेल्या गोष्टीसारखी नाही. मित्राला नीट ओळखत असल्याने त्याला ह्या जाहिराती सतत पाहायला सांगितल्या. एकदा त्याने रात्री तीनला एसएमएस केला, ‘कल फिर जीतना है....सूरज से पहले उठना है...उस से ज्यादा चमकना है...!’ आणि मी त्याला रिप्लाय केला, ‘हम में है हिरो!’ त्याने एक स्मायली पाठवला. तो अजूनही जपून ठेवलाय. कारण तो 'अमूल्य' आहे.

अविनाश.

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | Best Web Hosting