Friday, February 28, 2014

दानू बावा

मुंबईच्या 'फ़ाइव गार्डन' ह्या माटुंगा मधील भागात बरीच वर्दळ असते. गार्डन म्हटलं तर टांगे, छोटे पाळणे, भेळवाले, चणे-दाणे वाले आणि तत्सम विक्रेते असतात. लोकं आपल्या पोरांना घेऊन गार्डन मध्ये फिरायला येतात. कुठे दहा-बारा संघ वेगवेगळ्या खेळपट्ट्या पकडून एकाच मैदानात क्रिकेट खेळायची कसरत करीत असतात तर कुठे कुणीतरी संध्याकाळी तिथल्या कट्ट्यांवर योग किंवा कराटेचे 'क्लासेस' घेत असतात! जवळच २-३ कॉलेज असल्यामुळे तिथल्या जोडप्यांनी गार्डन मधील अंधारे कोपरे बऱ्याच चतुराईने शोधलेले असतात. शिवाय ह्या क्रियेला 'कॉलेज' ही मर्यादा नसल्यामुळे अशा लोकांची संख्या किंबहुना ( आणि मुंबईतील जागेच्या प्रश्नामुळे) जरा जास्तच असते! तर अशा ह्या गजबजलेल्या वातावरणा पासून थोडे पुढे चालत आलो आणि दादर च्या दिशेला जाऊ लागलो की एक वातावरणातील विरोधाभास जाणवू लागतो. रस्त्यावर शांतता निर्माण होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जुन्या शैलीतील इमारती दिसू लागतात. एक अगीयारी दिसते आणि आपण पारसी वस्तीत आल्याचे जाणवते. आणि पुढे 'मंचेर्जी जोशी' चौक येईपर्यंत आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबईची कल्पना करू लागतो. कुठे एखादा टांगा डोळ्यासमोरून धावतो तर कुठे एखादा सुट-बूट घातलेला इंग्रज अधिकारी समोर येतो. वातावरण मात्र ' कृष्णधवल' ( black & white ) असते. दानू ह्याच परिसरात लहानाचा मोठा झाला.

वास्तविक दानू हा माझा क्लासमेट. वेलिंगकर मध्ये  MBA शिकत असताना आमची ओळख झाली. हा योगायोगाने पहिल्या लेक्चरच्या वेळेस माझ्याच बाजूला बसला आणि मुलांमध्ये लगेच मैत्री होत असल्यामुळे आम्ही त्याच दिवसापासून गप्पा मारायला सुरुवात केली. हा माझ्याच प्रमाणे काही विषयात ज्ञान वाढावे म्हणून  MBA करीत होता. राहत होता वसईला आणि ऑफिस गोरेगावला.

एकदा प्रोफेसरांनी कुठला एक प्रश्न विचारला असताना ह्याने त्याचे उत्तर सरळ शब्दात द्यायचे सोडून थोडे लांबवून दिले. बोलण्यात थोडासा खट्याळपणा दिसला आणि सारा वर्ग हसला. आणि त्या दिवसापासून  हा काहीही बोलला तरी इतर मुलांची हसायला सुरुवात होऊ लागली. ते कसं आहे, एखाद्याला brand करायची सवय आम्हाला शाळेपासूनच आहे! हीच सवय मग काम करत असतानाच्या  MBA च्या वर्गात सुद्धा समोर येते. दानू मस्तीखोर होता. पण तो वर्गातला 'जोकर' नक्कीच नव्हता! त्यामुळे एकदा असेच नवीन प्रोफेसरांना ओळख करून देताना जेव्हा वर्गातली मुलं त्यावर हसली तेव्हा मात्र दानू ने त्यादिवशी रात्री १० वाजता मला फोन केला,

" माझं बोलणं जोकर सारखं होऊ लागलंय का? मी काहीही बोललो तरी लोकं का हसतात? मला हे अपेक्षित नव्हतं. तू मला समजून घेऊ शकतोस असं वाटतं … म्हणून तुला विचारलं!" त्यादिवशी त्याला जवळ जवळ अर्धा तास समजावलं.
" लोकं काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नकोस. जर ह्या लोकांमुळे तुझ्या आयुष्यात काही लक्षणीय बदल घडणार असेल तरच ह्यांच्यावर इम्प्रेशन जमव… नाहीतर त्यांना हसू दे!" माझ्या बोलण्यामुळे त्याला धीर आला असावा. कारण त्यानंतर तो माझ्या बरोबर अधिक बोलू लागला. घरी जाताना दादर स्टेशन पर्यंत एकत्र येऊ लागला. एकंदर करियर, पुढील आयुष्य वगेरे हे विषय येऊ लागले. आम्ही दोघेही ८७' साली जन्म झालेले निघलो. त्यामुळे आयुष्याची वाटचाल सारख्याच टप्प्यावर आलेली. आणि साहजिकच मैत्री वाढली!

दरम्यान दानू ने त्याचा मस्तीखोर स्वभाव कायम ठेवलेला. तो एका मोठ्या advertising कंपनीत सिनियर मनेजर च्या पदावर होता. लवकरच त्याची बढती होऊन तो regional manager देखील होणार होता. पगार चांगला होता. आणि पदाप्रमाणे बघितले तर माझ्या वयाचा असून सुद्धा माझ्या पेक्षा बराच सिनियर होता. त्याने बऱ्याच लहान वयात नोकरी करायला सुरुवात केलेली आणि इथपर्यंत पोहोचला होता. पण हे सर्व सुरु असताना त्याची मस्ती काही कमी झालेली नव्हती. तोच कॉलेज मधला खट्याळपणा त्याने सुरु ठेवला होता आणि त्यामुळे त्याच्या एकंदर पदाशी विसंगती निर्माण होत होती. आता दोन अविवाहित मित्रांमध्ये बोलले जाणारे विषय हळू हळू पुढे पुढे येऊ लागले होते आणि विषय लग्नावर येउन पोहोचला.

" माझी एंगेजमेंट झालेली आहे. लग्न करायला घरचे मागे लागले आहेत रे. दोन्हीकडचे. पण काय करू. सध्या सगळे पैसे नवीन घर घेतानाच्या हफ्त्यात जात आहेत. मुंबईचे जीवन तुला माहिती आहेच…"
" पण मग तू घर घेण्यात एवढी घाई का करतो आहेस?" मी विचारले.
" अरे...  मी सध्या राहतोय ते घर एवढं मोठं नाही रे. शिवाय चांगल्या परिस्थितीत देखील नाही. त्यामुळे लग्न झाल्यावर तिकडे राहण्यात काही अर्थ नाही. आणि शिवाय माझी बायको पारसी नाही ना… ", हसत हसत दानू म्हणाला.
" मग?" मी विचारले.
" अरे… आमच्या पारसी पंचायतचा नियम आहे. जर तुम्ही समाजाच्या बाहेरच्या मुलीशी लग्न केलंत तर तुम्हाला घर मिळणार नाही. पारसी कॉलोनी मध्ये तुम्ही राहू शकत नाही. आणि नेमका माझा प्रॉब्लेम तो आहे. सध्या आम्ही ज्या घरी राहतोय ते पारसी पंचायतचे आहे… आणि लग्नानंतर मला ते सोडावे लागणार आहे. माझ्या आई-बाबांना वसईला घर मिळाले होते. माझी आजी इकडे पारसी कॉलोनी मध्ये राहते…", तो म्हणाला.
" पण असं का?" मी विचारले.
" अरे…. मुंबईत पारसी लोकांची संख्या काही हजार इतकीच उरली आहे. त्यात सुद्धा ६०% लोक हे ४० च्या पुढचेच आहेत. त्यामुळे त्यांना मुलं होणार नाहीत. उरलो आम्ही.… आमच्याकडून अपेक्षा आहेत…. पण मला आवडणारी मुलगी पारसी नाही… काही वर्षात आम्ही संपुष्टात येऊ बघ", दानू अगदी शांतपणे म्हणाला. एकीकडे प्रत्येक भाषिक किंवा धार्मिक समाज आपले अस्तित्व जाणवू द्यायची चढाओढ करीत असताना आमचा समाज संपुष्टात येईल हे किती सहजपणे म्हणाला तो!

जसे दिवस पुढे जात होते तसे आमचे विषय वाढत जात होते. परंतु आपण कधी 'सेटल' होणार हा भेडसावणारा प्रश्न पुढे यायचा. तेव्हा तो सतत त्याच्या ह्या परिस्थिती बद्दल सांगत असे. जोपर्यंत त्याला नवीन घराचा ताबा मिळत नाही तो पर्यंत त्याचे लग्न होणार नव्हते. कारण जर लग्न आधी झाले तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी पारसी पंचायतचे ते घर सोडावे लागणार होते. आणि मुलीकडले ( पारसी नसल्यामुळे कदाचित) ह्या गोष्टीचे गांभीर्य समजण्यात कमी पडत होते आणि लग्नाची घाई करीत होते. एक दिवस गप्पा मारत मारत आम्ही दादर स्टेशन पर्यंत आलो. तेव्हा तो म्हणाला,
" आज मला आजीकडे जायचे आहे. … ती इथेच पारसी कॉलोनी मध्ये राहते. पारसी जिमखाना च्या मागे. तू वडाला स्टेशन वरून जाणार ना? चल मी तुझ्या बरोबर येतो." मला त्या दिवशी नेमके ट्रेन ने जायचे होते. मी देखील तयार झालो.  आणि चालत चालत, गप्पा मारत आम्ही वर वर्णन केलेल्या 'मंचेर्जी जोशी' चौकात आलो.

" इकडे आल्यावर जुन्या मुंबईचे चित्र डोळ्यासमोर येते,नाही?" मी म्हणालो. " म्हणजे … आपला जन्म पण झालेला नव्हता … पण त्या काळाबद्दल काहीतरी वाचलेले असते", मी म्हणालो.
" हो रे … ते खरं आहे… माझी आजी इकडेच राहते. बघ … त्या बिल्डींग मध्ये… ", दानू ने एका बिल्डींगकडे बोट केले.      
" खरंच खूप जुनी बिल्डींग आहे रे … ", मी म्हणालो. दानू ने आता मला त्याच्या घरी यायची गळ घातली. मी नाकी म्हणालो तर एवढी जुनी बिल्डींग आतून पण बघ असे आमिष दाखवले. मग मात्र मला राहवले नाही. आणि आम्ही आत एका घरात शिरलो.                     

" दानू आव्यो...मारो दानू आव्यो", असं म्हणत म्हणत एका तुकतुकीत चेहऱ्याच्या आजीने दरवाजा उघडला. तोंडात दोन- तीन दात शिल्लक असून सुद्धा त्या आजीचे हसणे अगदी गोंडस जाणवत होते. पारशी पद्धतीचा 'ड्रेस', जुना शैलीचा चष्मा, बुटकी उंची आणि केसांचा अंबाडा. माझी ओळख करून दिली गेली आणि आम्ही आत शिरलो. आत गेलो तर फक्त एक खोलीचे घर. एका कोपऱ्यात किचन आणि दुसऱ्या एका छोट्याशा कोपऱ्यात बाथरूम-संडास. वर बघतो तर उंच छप्पर आणि एक जुना पंखा. एका कोपऱ्यातून ट्यूब आपले अस्तित्व जाणवू द्यायचा प्रयत्न करीत होती. आपण मुंबईतल्या जुन्यातल्या जुन्या इमारतीत आलो आहोत ह्याची मला परत एकदा साक्ष पटली. ही साक्ष पहिल्यांदा बिल्डींगच्या गेट पाशी पटली होतीच. आणि समोर ह्या आजी माझ्या आणि मी कल्पना करीत असलेल्या ४० च्या दशकातील पारशी प्रभावाच्या मुंबईतल्या त्या 'एरिया' मधला एक दुवा होत्या! आता आजीच ती! आम्हाला बसवलं आणि त्या कोपऱ्यातल्या किचन मधल्या एका कपाटातून एक छोटासा डबा बाहेर काढला. आणि बशीभर बिस्किटं आमच्या समोर आली. मी ह्याला म्हणालोच. " आजी कुठलीही असो… नातवासमोर काहीतरी येणारच!"
" ह्या घरात आयुष्याची पहिली ९ वर्ष काढली. मी, माझा भाऊ, आणि आजी-आजोबा! ह्या घरात खूप आठवणी आहेत... ह्या एका खोलीत! . मला नोकरी मुळे आता वेळ मिळत नाही. म्हणून आजी नेहमी  म्हणते, " दानू आमचा महाराज आहे … त्याच्या मर्जीने येतो." मी हळूच त्याच्या आजीकडे बघितले. ती दानू कडे कौतुकाने पाहत होती.

" मग तुमच्या सणाच्या दिवशी आई-बाबा वगेरे सगळे इकडे येता का?" मी सहज विषय वाढवावा म्हणून बोललो.
" माझे वडील वारले रे… असं पण मी आठ वर्षांचा असताना दोघांचा 'डिवोर्स' झाला. लहानपणापासून त्यांची भांडणं होयची.म्हणून मी इकडेच असायचो. नंतरचे लहानपण हॉस्टेल मध्ये काढले. पण हॉस्टेल मध्ये मी खूप मस्ती करायचो …. त्यामुळे मला परत इकडे आणले गेले. मग इथेच होतो नोकरी लागेपर्यंत. आई मात्र वसईला असायची आणि अधून मधून इकडे यायची. दरम्यान आजोबा वारले दहावीत असताना … तेव्हापासून आजीने वाढवले. बस आता नवीन घराची वाट पाहतोय … सगळ्यांना तिकडे घेऊन जायला!"
मी हळूच त्याच्या आजीकडे परत एकदा पाहिले. हे सांगताना ती कुठे तरी शून्यात बघत बसली होती. कदाचित ह्या आठवणी तिला पुन्हा आल्या असाव्यात. मी जाताना मला ' परत ये' असं म्हणाली.
" माझी आजी लक्ष्मी भक्त पण आहे. लक्ष्मी आणि शंकर ह्यांची नित्यनेमाने पूजा करते", मी बूट घालत असताना दानू मला म्हणाला.

वडाळा स्टेशन पर्यंत चालत जाताना मला पहिल्या दिवशी भेटल्या पासून दानूचे सारे किस्से मी आठवले. त्याचे ते हरवलेले बालपण मला एकदम लक्षात आले. लहानपणी सर्वांसारखे व्यक्त होता आले नव्हते त्याला. त्याच्या मस्तीखोर स्वभावाचे कारण चटकन माझ्या लक्षात आले आणि किंचित हसून मी ट्रेन पकडायला पुढे सरसावलो.  

- आशय गुणे :)

Sunday, June 2, 2013

जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण (?)

"जामिनाचे पैसे कोण भरतय?" पोलिसांनी मला विचारले. 
"मी", मी उत्तर दिले. 
पोलिसांनी माझ्याकडे निरखून बघितले. " कोण लागतो हा तुमचा?" मला प्रश्न विचारला गेला.
"मित्र ", मी उत्तरलो. 
" जरा समजावा तुमच्या मित्राला", पोलिस ऑफिसर म्हणाले. 
मी पैसे भरले, सही केली आणि जग्या बाहेर यायची वाट  बघू लागलो.    

तशी आमची ओळख शाळेपासून. अगदी एका बाकावर बसून आम्ही अनेक विषयांकडे दुर्लक्ष करायचो. जांभयांची जुगलबंदी सुरु असायची. गणिते आपण का सोडवतो, त्याने काय मिळते ह्या गहन विचारात मार्कांची मात्र वजाबाकीच झाली. इतिहास वगेरे विषय गोष्ट म्हणून ऐकले पण पेपरात मात्र गोष्टींना स्थान नसते हे आम्हाला शेवटपर्यंत नाही कळले.( ह्याचा उपयोग दहावीच्या परीक्षेत मात्र झाला! ;) ) हिंदी, मराठीतल्या कविता जेव्हा पाठ करण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा मात्र हे सारे कवी आमच्या द्वेषाच्या यादीत सर्वोच्च स्थानावर जाउन बसले. पण तेव्हाच तुकोबांची 'लहानपण देगा देवा' ही कविता आमच्या पुस्तकात आली आणि त्तुकोबा 'सारे कवी रटाळ असतात' ह्या आमच्या सिद्धांताला एक जबरदस्त अपवाद ठरले. तेव्हा जग्याच मला म्हणाला होता. " मला ही कविता आवडली. आणि खास करून ही ओळ:

जया अंगी मोठेपण 
तया यातना कठीण 

पुढे आमची मैत्री वाढली आणि मी त्याच्या घरी देखील जाऊ लागलो. काका-काकुंशी ओळख झाली. त्याला एक मोठा भाऊ होता - विलास - त्याच्याशी अधून मधून गप्पा होऊ लागल्या. अधून मधून कारण ह्याच्यात आणि विलास मध्ये १० वर्षांचे अंतर होते! ह्याच्या पुस्तकांना कव्हर घालणारा, हा शाळेत का आला नाही हे 'कारण' दाखवणारी नोट ( ह्याच नोट ची concept  पुढे कोर्टाने 'कारण दाखवा नोटीस' म्हणून उचलली असेल!) लिहिणारा, रोज ह्याचे दप्तर तपासणारा ह्याचा दादा आता माझ्या ओळखीचा झाला होता. घरी गेल्यावर साधं पाणी आणायचे काम सुद्धा तोच बिचारा करायचा. जग्या नुसता ऑर्डर सोडे. " दादा... पाssss णीssss" आतून आवाज येई. " तू घे रे.. मला वेळ नाही ... मी कामात आहे.." 
तर जग्याच उलटा ओरडे. " आsss ईsss ... दादा बघ ना ... मला पाणी देत नाही!" आणि आतून ह्याची आई चक्क दादालाच ओरडे! आणि मग मात्र त्याला आम्हाला पाणी द्यावे लागे. बिचाऱ्याची फार कीव यायची तेव्हा. 
असाच एक प्रसंग आठवतो. आम्ही अकरावीत होतो. सहज कॉलेज संपल्यावर मी जग्याकडे गेलो. गप्पा मारण्यात, कॉम्प्युटर समोर बसण्यात वगेरे बराच वेळ गेला. संध्याकाळी विलास दादा थकून भागून कामावरून आला. काकूंच्या एकदम लक्षात आले की इस्त्रीचे कपडे आणणे राहून गेले होते. त्या आत आल्या आणि जग्याला म्हणाल्या , " जगू .. बाळा ... इस्त्रीचे कपडे घेऊन ये रे..." आमची कॉम्प्युटर समोरची तंद्री मोडली आणि जग्या जोराने ओरडला. " आम्हाला का सांगते आहेस.. दादाला सांग ना..." 
आणि हे ऐकून क्षणात काकू विलास कडे वळल्या आणि पुढे काय? बिचाऱ्या दादाला परत जाउन हे काम करावे लागले. आणि अचानक मला काही वर्षांपूर्वी शाळेत वाचलेली तुकोबांची कविता आठवली : 
        
जया अंगी मोठेपण 
तया यातना कठीण

जग्याला नेमकी हीच ओळ आवडायची.  शाळेत एकदा तो मला म्हणाला सुद्धा होता. "लहान मुलांचं सगळेच ऐकतात.. तुकाराम एकदम  बरोबर बोलतो .."  मी त्याच्या घरी जाऊ लागलो आणि त्याच्या असे बोलण्या मागचे नेमके कारण मला आता कळू लागले होते. 
विलास हा घरचा आधार होता. घरात वडील ६४ वर्षांचे झाले होते. आई काही २ वर्षात साठीत प्रवेश करणार होती. त्यामुळे बऱ्याच वेळेस 'दादा म्हणेल तसे' अशी अवस्था निर्माण झाली होती. आणि जग्या तर शेंडेफळ! त्याच्याकडून कधी कसलीच अपेक्षा ठेवली गेली नाही. मात्र 'तो म्हणेल तसे' अशी मात्र एक विचित्र सवय त्या घराला लागली होती! ह्या पार्श्वभूमीवर आमची बारावी पार पडली. बारावीच्या आकड्याप्रमाणे अगदीच बारा नाही वाजले. पण जेमतेम फर्स्ट क्लास मिळाला आणि आम्ही 'पुढे काय'  ह्या विद्यार्थी दशेतल्या सर्वात आवडत्या प्रश्नाकडे परत एकदा वळलो! माझा निर्णय ठाम होता. डिग्रीला जायचे! कारण मेडिकल आणि इंजीनियरिंग ह्या दोन्ही पैकी कुठेही मला जायचे नव्हते! लोकं माझा हा निर्णय मूर्खपणाचा आहे असा 'निर्णय' केव्हाच घेऊन बसले होते! जग्या मात्र आपण कुठले क्षेत्र निवडायचे ह्या निर्णयाला येऊ शकला नव्हता. आमच्या इथल्या एका कॉलेज मध्ये माझा प्रवेश पक्का झाला.  कॉलेज सुरु होण्याच्या एक दिवस आधी मी त्याला भेटायला गेलो.
" मी कॉम्प्युटर इंजिनियरिंग साठी admission घेतो आहे. त्याला खूप स्कोप आहे रे. माझा दादा म्हणतो खूप चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आहेत पुढे. आय. टी ला खूप स्कोप आहे पुढे!" त्याने त्याचा निर्णय सांगितला होता. 

 महाराष्ट्रात त्यावेळेस राजकीय परिथिती चांगलीच तापत होती. मराठी बाणा मनी बाळगून ( निदान असं सांगून ..) एक राजकीय पक्ष राजकारणात आपली वाट धरत होता. पक्षाच्या नेत्यांनी तरुणांना लक्ष करायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांच्या भाषणात बऱ्याच वेळेस शिव्यांचा वापर होत असे. 'आमच्या मध्ये कोण येईल त्याला फोडून काढू ...' असा सदैव पवित्रा असायचा. शिवाय 'आपल्यावर बाहेरून आलेल्या लोकांनी अंन्याय केला आहे' हे सदैव ठासवले जायचे. मराठी भाषा तशी 'आपण वळवू तशी' ह्या प्रकृतीची! परंतु ह्या भाषेच्या सौंदर्याचा उपयोग 'डबल मिनिंग' ची वाक्य भाषणात बोलून टाळ्या मिळविण्यासाठी होऊ लागला होता. मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हा गल्लीबोळात ह्या पक्षाची लोकं टेबलं टाकून बसायची. टेबलांवर टी.व्ही आणि त्यावर ह्यांच्या तडफदार नेत्याची भाषणं! बरीच तरुण मंडळी ही भाषणं ऐकत आणि बहुतेक वेळेस 'डबल मिनिंग' वर हसत आपला वेळ सत्कारणी लावत असत!  आणि जेव्हा शिक्षण संपल्यावर आम्ही नोकरीला लागलो तेव्हा ह्या पक्षाने चांगलाच जम बसवला होता. 

एकदा असंच एका सकाळी दाराची बेल वाजली. रविवारी सकाळी कोण आलंय ह्या विचारात मी दार उघडलं तर समोर जग्या उभा! बऱ्याच दिवसांनी भेटलो त्यामुळे आम्ही एकमेकांना मिठी मारली! त्याने नंतर 'त्या' पक्षाचे नाव घेतले, आपल्या साहेबांचे नाव घेतले आणि मागे उभे असलेल्या लोकांकडून 'जय' म्हणवून घेऊन माझ्या पुढे पावतीपुस्तक ठेवले! आणि सारा प्रकार माझ्या लक्षात आला. मी निमुटपणे दहीहंडीची वर्गणी दिली. 'गणपतीची वर्गणी पण द्यायची…. ह्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट' असे बजावण्याच्या  सूरात सांगत मंडळी पुढच्या घराकडे वळली! मी जग्याला त्या दिवशी संध्याकाळी नाक्यावर चहाला बोलावले.   

" च्यायला… ह्या बाहेरच्या लोकांमुळे आपल्याला नोकऱ्या मिळत नाहीत! साले बघू तिथे हेच लोक घुसलेले असतात! एकेकाला पकडून, भर चौकात चाबकाने फोडून परत त्यांच्या राज्यात पाठवले पाहिजे!" जग्या पेटला होता. 
" अरे! आपल्याला नोकऱ्या मिळत नाहीत तर आपण स्वतः प्रयत्न करून शोधाव्या नोकऱ्या. मिळतील रे शोधल्या तर", चहाचा घोट घेत मी म्हणालो.  
" घंटा! ह्या लोकांनी नोकऱ्या दिल्या तर ना! ह्या लोकांना आपण नको असतो!"
" अरे, असं नसतं रे जग्या! आता मी सेल्स कॉल म्हणून बऱ्याच कंपन्यांमध्ये जातो… असतात की आपली माणसं. आणि हो, मोठ्या पदावर पण असतात", मी म्हणालो. 
" ते साले त्यांच्यात मिसळलेले असतात! मला सांग, ह्या लोकांसमोर उद्या जर एक मराठी मुलगा आणि एक अमराठी मुलगा नोकरीसाठी आले तर? देतील रे मराठी मुलाला नोकरी?" 
मी निमुटपणे चहाचे पैसे काढले आणि ह्या पुढे आपल्याकडून कसलीच चर्चा होऊ शकत नाही ह्याची कबुली स्वतःला दिली! आणि आम्ही त्या चहावाल्या 'भैय्या' च्या दुकानातून बाहेर पडलो. 
पुढे चालत जाताना मी त्याला अजून बोलतं केलं. हा इंजिनियरिंग बऱ्यापैकी रखडत पास झाला होता हे ऐकण्यात आले होते. पण बरीच वर्ष बोलणं झालं नव्हतं. 
" अरे इंजिनियरिंग मध्ये लै बोर व्हायचं… पण मग म्हटलं शेवटी नोकरी मिळेल.  पण कॉलेज प्लेसमेंट मध्ये मला सिलेक्ट केलंच नाय. सगळी पोलिटीक्स! अमराठी लोक नेमके निवडले गेले … सिलेक्ट करणारी होती कुलकर्णी … पण उपयोग काय?
ती पण त्यांच्यात मिसळलेली … "
" मग?" मी विचारले. 
" मग काय? एकदा डिग्री मिळाल्यावर नोकरी मिळणे कठीण झाले होते…"
एकंदर काय तर नोकरी मिळणे कठीण होऊन बसले होते. मध्ये ह्याने एक नोकरी केली होती. परंतु तोपर्यंत साहेबांचा पगडा ह्याच्या डोक्यावर इतका बसला होता की तिथल्या 'अमराठी' बॉस बरोबर ह्याचे जमणे कठीणच! ह्याने नोकरी सोडली आणि इकडची तिकडची कामं करत पक्ष-कार्यात गुंतला! 
दरम्यान ह्यांच्या साहेबांनी निवडणुकांच्या वर्षभर आधी राज्याच्या गृहमंत्र्यांशी वैर ओढून घेतले होते. साहेबांच्या प्रत्येक भाषणात ' डबल मिनिंग' चे विनोद असायचे. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापत चालले होते. आणि ह्या दोन पक्षातील कार्यकर्ते एकमेकांशे मारामारी करतील का अशी परिस्थिती निर्माण झाली.  नंतर अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात चायनीजच्या गाडी जवळ एका शुल्लक कारणामुळे ह्या दोन पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. मोठा राडा झाला. शिवाय गृहमंत्री एक वक्तव्य करून बसले ज्यात त्यांनी आपल्या लोकांच समर्थन केलं. आणि राज्यात तणाव निर्माण झाला. 

 आमच्या शहरी देखील ह्यांच्या पक्षाचा मोर्चा होता. नुसता मोर्चा नव्हता तर त्यात पुतळे जाळण्याचा कार्यक्रम सुद्धा होता.  शहरातील अध्यक्ष नेतृत्व करणार होते. मुख्य चौकात मोर्चा सुरु झाला.  घोषणा सुरु झाल्या,

आज दूध कडवा है,
गृहमंत्री भडवा है!
  
 मराठी बाणा बाळगणारा पक्ष घोषणा मात्र हिंदीत देत होता हे बघायला मजा वाटत होती. अध्यक्षांनी इशारा दिला. पुतळा जाळल्यावर कार्यकर्ते तोडफोड करू लागले. त्यात हा देखील होता. पोलिसांनी लाठीमार केला आणि सर्वांना आत टाकले. आणि सर्वांना भरपूर बदडले. अध्यक्ष मात्र सुखरूप बाहेर पडले. त्यांना तारणारे कुणीतरी होतेच. 

 जग्या तुरुंगातून बाहेर आला. धड चालता पण येत नव्हते. माझ्याकडे बघून हसला आणि मी जामीनाचे पैसे दिले म्हणून मला धन्यवाद दिले. सगळे कार्यकर्ते अडकले होते. अध्यक्ष मात्र सुटला होता. मला जग्याची आवडती ओळ आठवली -   
जया अंगी मोठेपण 
तया यातना कठीण      
आणि काळानुसार बदललेल्या तुकोबांचे दर्शन मला तेव्हा झाले! आज महापूर आला की झाडे मात्र वाचतात आणि लव्हाळ मात्र वाहून जातात!  

- आशय गुणे :) 

Tuesday, March 26, 2013

फू बाई फू

फू बाई फू फुगडी फू
दमलास काय बाबा संजया तू
रे संजया तू

आत पोकळ बाहेर पोकळ कायद्याचा वेळू
आत पोकळ बाहेर पोकळ कायद्याचा वेळू
खटल्याचा डाव मांडला, तो ही पोरखेळू
आता फुगडी फू...
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय बाबा संजया तू
रे संजया तू

तुझ्यापायी तोडती सगळे अकलेचे तारे
तुझ्यापायी तोडती सगळे अकलेचे तारे
दिल्लीपासनं गल्लीपातूर उधळले सारे
आता फुगडी फू...
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय बाबा संजया तू
रे संजया तू

तुझ्यासाठी जर बापाच्या पुण्याईची रास
तुझ्यासाठी जर बापाच्या पुण्याईची रास
पोलिसाचा पोर दाऊद सोडतो निश्वास
आता फुगडी फू...
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय बाबा संजया तू
रे संजया तू

हत्याराची दोस्ती मित्रा कधी नाही खरी
भुतकाळाने बुडवली सगळी गांधीगिरी
आता फुगडी फू...
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय बाबा संजया तू
रे संजया तू

वर्षभराची सुट पुरेशी माफी नाही का रे?
देशद्रोहाचा आळ गेला, काफी नाही का रे?
पश्चात्ताप कसला तुला आजही नाही का रे?
आता फुगडी फू...
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय बाबा संजया तू
रे संजया तू

- वैभव गायकवाड

Thursday, March 7, 2013

'ती'ची कथा

ही  कथा 'मायबोली' ह्या दिवाळी अंकात (online) प्रकाशित झाली होती!


बरोबर एक मोठा बुके आणि थोडी चॉकलेट्स घेऊन मी, माझी पत्नी, आणि माझा ८ वर्षांचा मुलगा ड्राईव करत चाललो होतो. बाल्टिमोर काऊंटीमधील शांत परिसरात गाडी वेगात पळत होती. तितक्याच वेगात आमचा उत्साह आणि आनंद देखील वाहत होता. प्रसंगच तसा होता. नुकतेच नोबेल पारितोषिक विजेते घोषित झाले होते. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जगातील मान्यवरांची ओळख हळू हळू होऊ लागली होती. अमेरिकेत जे थोडे लोक पेपर वाचतात, त्यांच्यात आम्ही देखील असल्यामुळे रोजचे लेख आम्हाला काय ती माहिती पुरवीत होते. ह्या सार्‍या यादीत एका त्रिकुटाचा समावेश होता. हे त्रिकुट होते शास्त्रज्ञांचे. जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीमधील मेडिकल सायन्स शाखेतील एका मोठ्या प्रयोगाने मागच्याच वर्षी जगाचे लक्ष वेधून घेतले होते. मानवी शरीरातील पेशींमधील (cells) 'डीएनए'वर हे संशोधन होते. पेशींच्या एका विशिष्ठ भागात, ज्याला न्युक्लिअस म्हणतात, हे डीएनए असते. या डीएनए चे प्रोटीन नामक सत्वात रुपांतर होते आणि पुढे हेच प्रोटीन आपली शारीरिक वाढ किंवा जडणघडण होण्यास कारणीभूत ठरते. परंतु इतके दिवस पेशींच्या अन्य भागात देखील डीएनए असू शकते याचा कोणालाच पत्ता नव्हता. शास्त्रज्ञांच्या या त्रिकुटाने एका मोठ्या प्रयोगाची मदत घेऊन हे शोधून काढले की पेशींच्या अन्य भागात देखील डीएनए असते आणि त्याचे रुपांतर शरीरातील महत्त्वपूर्ण प्रोटीनमध्ये होते. या त्रिकुटात एक भारतीय नाव झळकल्याचे आमच्या ऐकण्यात आले होते. आणि सहज त्या दिवशी पेपर उघडला तर काय आश्चर्य! दोन अमेरिकन शास्त्रज्ञ मंडळीत एक नाव "तिचे" होते. लगेच येणार्‍या शनिवारचा मुहूर्त धरला. ( इकडे मुहूर्त ही कल्पना म्हणजे विकेंड! आणि केवळ विकेंडच..) आणि आम्ही सारे तिच्या घरी तिचे अभिनंदन करायला निघालो.

सहा वर्षांपूर्वी शिकागो सोडून आम्ही बाल्टिमोरला स्थाईक झालो. नवीन शहरी जातानाची एक सवय अमेरिकेत पाऊल ठेवल्यापासून कायम होती. तिकडे असलेल्या भारतीय लोकांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवायची. आपला एकूण देश अनेक राज्यात विभागला गेल्याचे आपल्या भूगोलाच्या पुस्तकानेच लहानपणी मनात ठसवल्यामुळे या भारतीयांमध्ये मराठी कोण हे सुद्धा बघणे आलेच. आमचा मुलगा, त्याचा जन्म इकडे झाल्यामुळे अनेक 'रंगांमध्ये' लीलया मिसळू शकत होता! आमचे तसे नव्हते. तर सहज लिस्ट चाळत होतो तर हिचे नाव त्यात! नाव वाचून आश्चर्याचा धक्काच बसला. हीच का ती ह्याची खात्री करायला इ-मेल पाठवला तर तीच निघाली! आणि मुख्य म्हणजे तिने मला ओळखले होते. बाल्टिमोर मध्ये कधीही येशील तेव्हा घरी ये असा संदेश तिने लगेच पाठवला! आणि पुढे वाचले तर 'सिनिअर सायंटिस्ट, जॉन हॉपकिन्स' असे तिचे डेसिग्नेशन वाचले तेव्हा थक्क झालो! खूप प्रगती केली होती तिने. स्वतःचे क्षेत्र गाजवले होते!

वास्तविक मी हिचा विद्यार्थी. बायोटेक हे क्षेत्र भारतात नवीन आले तेव्हा ह्यात खूप स्कोप आहे असे ऐकून आम्ही त्यात उडी घेतली होती. दुसर्‍या वर्षी शिकत असताना ही आमच्या कॉलेज मध्ये शिकवायला जॉईन झाली. पीएचडी संपवून आणि थोडा फार रिसर्च करून ती प्रोफेसर म्हणून रुजू झाली होती. तिचे वय तेव्हा २६ होते. एक अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय प्रोफेसर अशी तिची ख्याती होती. त्यामुळे आम्हा मुलांचं (आणि मुलींचं सुद्धा!) तिच्याशी काही फार जमायचं नाही. मुली देखील तिच्या समोर नोट्स काढायचा आव आणत असल्या तरी तिच्या मागे (आणि मागेच!) तिचा समाचार घ्यायच्या. काही मुलांची तर तिच्याशी वादावादी झाली होती. वर्गात जोरजोरात भांडण होणे बाकी ठेवले होते काहींनी! हिने तिच्या आयुष्यात शिस्तीला खूप महत्त्व दिले होते पण आमच्यावर ती शिस्त लादताना गफला व्हायचा!

"हिचे अजून लग्न झाले नाही ना! म्हणून ही सदैव रागात असते... हिला कुणीतरी नवरा आणून द्या रे!" - तिच्या शिस्तप्रिय स्वभावाचे आणि तो आमच्यावर लादल्याचे खापर तिच्या अविवाहित राहण्यावर फोडले जायचे. तिचा विषय निघाला की हे वाक्य हमखास बोलले जायचे. संभाषणात सर्वप्रथम तिच्या उच्च शिक्षणावर जोर दिला जायचा. आश्चर्य व्यक्त केले जायचे... क्वचित आदरभाव सुद्धा! पण तिचे लग्न नाही झाले ह्या विषयावर येऊन सगळं संपायचं! काळजीच होती जणू सार्‍या मुलांना हिच्या लग्नाबद्दल! पुढे आम्ही ग्रॅज्युएट झालो आणि आमच्यापैकी बर्‍याच लोकांना असा साक्षात्कार झाला की आम्ही निवडलेल्या क्षेत्राला अजिबात स्कोप नाही! आणि सर्व क्षेत्रांचा शेवट ज्या एका पदवीने होतो तेच आम्ही केले - एमबीए! पुढे नशीबाने चांगले दिवस दाखवत एक चांगली नोकरी दिली. आणि त्याचे पेढे द्यायचे म्हणून मी आमच्या या आधीच्या कॉलेज मध्ये गेलो. तेव्हा समजलं की ही अमेरिकेला जायचे म्हणून प्रोफेसरगिरी करून पैसे जमवत होती. पोस्ट-डॉक करण्यासाठी. आम्ही थक्कच झालो होतो!

"अजून किती शिकायचे माणसाने! आता बास ना", इथपासून, "लग्न काय अमेरिकेत जाऊन करणार काय? नक्कीच कुणीतरी गोरा पकडेल... दिसते तर माल एकदम" इथपर्यंत सारी वाक्यं बोलली गेली होती.
अजून काही वर्ष गेली आणि मला अमेरिकेत पाठवले गेले. २८ व्या वर्षी ही संधी आल्यामुळे घरचे एकदम खुश होते. आता मला कुणीही मुलगी देईल ही त्यातली एक भावना. आणि झालेही तसेच. लग्न करून मी अमेरिकेत गेलो.

बाल्टिमोर मध्ये आल्यावर लगेच काही हिची भेट झाली नाही. तिकडच्या महाराष्ट्र मंडळात गेलो तेव्हा मात्र तिच्याबद्दल थोडे ऐकले. "तिचे काय... नाव भारतीय आहे फक्त... बाकी काय भारतीय आहे तिच्यात?" असे एक वाक्य एका गृहस्थाने बोलून दाखवले होते आणि सर्वांनी एकमताने हसून त्या माणसाला दाद दिली होती. ती ज्येष्ठ शास्त्रज्ञ असल्यामुळे खूप व्यस्त असायची. त्यामुळे आल्यापासून २-३ आठवडे काही भेट होऊ शकत नव्हती. शेवटी तिनेच एकदा रविवारी बोलावले. आणि जवळ जवळ १५-१६ वर्षांनी डॉ. सुलभा प्रभुणे हिला भेटलो. जवळ जवळ ४५ वर्षांच्या डॉ. प्रभुणे मध्ये लक्षणीय बदल झाला होता. पंधरा वर्षांपूर्वी खांद्यापर्यंत येणार्‍या केसांचा बॉय-कट झाला होता. चेहर्‍यावरचा चष्मा जाड भिंगांचा झाला होता. केस बर्‍यापैकी पिकले होते. आणि चेहरा थोडासा का होईना सुरकुतलेला दिसत होता. तिची इकडची प्रगती ऐकून आणि पंधरा वर्षांनी परत एकदा थक्क होऊन मी घरी गेलो. पोस्ट-डॉक करायला आलेल्या तिने खूप चांगला परफॉर्मन्स देऊन आणि अनेक रिसर्च पेपर प्रकाशित करून बढती मिळवली होती. आणि ५ वर्षांपूर्वी स्वतःची प्रयोगशाळा सुरु केली होती.

"मग, या कधी आमच्याकडे!" मी म्हणालो. "या म्हणजे कोण आता?" तिने एकदम विचारले. "म्हणजे तुम्ही सगळे..." मी पुढे बोलणार इतक्यात तीच म्हणाली. "फॅमिली वगेरे कुणीही नाही इकडे... मी एकटीच राहते... मी लग्न नाही केलं!" थक्क होण्याचे कारण फक्त तिचे उच्च शिक्षण एवढेच नव्हते हे वेगळं नको सांगायला!
आल्यापासून ३-४ वर्षात मी मात्र जितक्या वेळेस शक्य होईल तितक्या वेळेस तिला विकेंडला घरी बोलवायचो. ओळख अजून वाढू लागली. आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये कसे झाले कळले देखील नाही. इतके दिवस 'अहो-जाहो' करणार्‍या मला शेवटी तिने 'अरे-तुरे' ने हाक मारायला सांगितली. कॉलेज मध्ये तशी हाक आम्ही मारत होतोच... अर्थात तिच्या पाठीमागे. आता मात्र तिला अशी हाक मारायची परवानगी खुद्द तिनेच दिली.

क्वचित कधीतरी ती महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना किंवा माझ्या घरी ठेवलेल्या कार्यक्रमांना यायची. तेव्हा सुद्धा स्वारी एकटीच. जास्त कुणी तिच्याशी बोलायचे नाही. मंडळाचे कार्यक्रम झाले की ही एकटीच निघून जायची. मी माझ्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात उभा असलो तर आमच्यात न येता एकटीच घरी जायची. जर मी एकटा असलो तर मात्र मला भेटून, चार शब्द बोलून घरी जायची. क्वचित हिच्याशी आणि माझ्या मुलाशी पण बोलायची. पण एकूण सगळं एकट्यानेच! खरं तर तिचे रुटीन खूप व्यस्त असायचे. सकाळी लवकर लॅबमध्ये जायची. आणि रात्री यायला ९-१० वाजायचे. कधी कधी विकेंडला पण जावे लागायचे. त्यामुळे एकूण बिझीच!

दरम्यान मला हिच्याबद्दल जे मत ऐकायला मिळत होते ते काही फार चांगले नव्हते. बाल्टिमोर काऊंटी मध्ये बर्‍याच वर्षांपासून राहणार्‍या एका गृहस्थाने हिला म्हणे वेगवेगळ्या गोर्‍या लोकांबरोबर फिरताना बघितले होते. लेट-नाईट पार्टी करताना ती बर्‍याचदा दिसली होती. हिच्या घरी बर्‍याचदा कोणीतरी यायचे. मला देखील हिच्यापासून सावध राहायला सांगितले गेले. मुलांना तर लांबच ठेवा असा पण सल्ला देऊन झाला होता! ही बाई एकेकाळी माझी शिक्षिका होती ही गोष्ट मी ह्यांच्यापासून लपवून ठेवली होती. तिने सांगायचा तर प्रश्नच नव्हता! तिच्याशी बोलताना एवढे सुद्धा समजले होते की ही बाई बर्‍याच वर्षांपूर्वी एकदा भारतात गेली होती. तिने सांगितलेले साल म्हणजे ती साधारण ३३ वर्षांची वगैरे असली पाहिजे. त्यानंतर आजच्या दिवसापर्यंत काही ती भारतात गेली नव्हती. भुवया उंच करायला लावणारी केस होती हिची हे मात्र खरं!

मी इकडे आल्याच्या वर्षभरातच तिची स्वतःची प्रयोगशाळा सुरु झाल्यामुळे तिकडे होणार्‍या गोष्टी माझ्या कानावर यायच्या. आणि खूप वर्षांपूर्वी पदवी बायोटेक मध्ये मिळवल्यामुळे तेव्हा असलेल्या शिक्षिकेकडून त्याची उजळणी देखील होत असे. तिचे विचार संशोधनात अंमलात आणण्यासाठी एक चांगली टीम तिच्याकडे होती. पीएचडी करायला आलेले विद्यार्थी हुशार होतेच शिवाय पोस्ट-डॉक वाले लोक सुद्धा खूप मेहनती आणि सर्जनशील होते. त्यामुळे संशोधनातील हिच्या विचारांना चांगले पाठबळ होते. आणि त्यामुळे परिणाम चांगले मिळायचे. डॉ. प्रभुणे हे एक प्रभावी नाव झाले होते. दर वर्षी रिसर्च ग्रँट मिळणार्‍या शास्त्रज्ञ मंडळींमध्ये हिचे नाव होते. पण आमच्या लोकांकडून एकूण हिच्या कामगिरीची तेवढी दाखल घेतली जायची नाही एवढे मात्र खरे. कुठल्यातरी गाण्याच्या किंवा वाजवण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन जिंकलेल्या लोकांचा सत्कार होत असे. मात्र मी ३ वेळा सत्कारासाठी हिचे नाव पुढे केले तेव्हा तिन्ही वेळेस मला वेड्यात काढून तो प्रस्ताव फेटाळण्यात आला होता!

मात्र तिच्यामुळे जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटी बघायची संधी मात्र मिळाली. नुसती नाही तर अगदी आतून. एरवी, जगाला जवळ जवळ ४० नोबेल पारितोषिके मिळवून देणारी ही 'पवित्र' वास्तू अगदी आतून बघायचे भाग्य कुणाला मिळेल? सतत काहीतरी नवीन शोधण्याच्या मागे असलेले हे इथले शास्त्रज्ञ बघितले की आपण  एका वेगळ्याच विश्वात आहोत ह्याची नक्कीच खात्री पटते! बाहेर जगात काय चालले आहे ह्याची फारशी पर्वा न बाळगता, एकाग्रतेने इकडे काम सुरु असते. सतत त्याच विश्वात राहून आणि त्याच विश्वात राहण्यासाठी पोषक अशा वातावरणात नांदून उत्कृष्ट शोध लागतात! आणि त्यामुळे एका अर्थाने जग चालते. ती पण त्याच जगातली. भारतातून एक ध्यास मनात बाळगून आली होती. आणि तिने ठरवलेल्या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल केली ह्यावर, मिळालेल्या नोबेल पारितोषिकाने शिक्कामोर्तबच केले होते!

घराची बेल वाजवली. आणि पुढच्या अर्ध्या तासात एका आश्चर्यचकित करणार्‍या उत्तराला मला सामोरे जावे लागले. बुके दिला. आनंदाने चॉकलेट्स देखील दिली. आणि अभिनंदन करणे सुरु केले. बोलताना पुढे म्हणालो. "घरी फोन केलास की नाही? खूप खूष असतील ना सगळे?" उत्तर निर्विकारपणे नाही असं आल्यावर मात्र मी एकदम आश्चर्य व्यक्त केले. आणि "फोन कर गं" असं तिला एक-दोनदा सांगितले. शेवटी तीच म्हणाली.
"मी माझ्या घरच्यांशी संबंध तोडून टाकले आहेत. त्यांना माझ्या यशाविषयी किंवा एकंदर आयुष्याविषयी काहीही घेणंदेणं नाही!"
"अगं पण का? असं कसं?"
TichiKatha.gif
"हो मग काय... त्यांना काहीच पडलेली नाही. मी त्यांच्यासाठी मेले आहे. भारतात अजून पुरुषच शास्त्रज्ञ होत असतात. सर्वांचा विरोध पत्करून मी इकडे पोस्ट-डॉक करायला आले. बाबांनी शेवटी एका अटीवर परवानगी दिली. २ वर्षात घरी परत येऊन लग्न करायचे. दोन वर्षाच्या पोस्ट-डॉक ने काय होणार आहे? ती तर शास्त्रज्ञ बनण्याची सर्वात पहिली पायरी आहे... त्यांना कुठे माहिती होते की पोस्ट-डॉक निदान पाच वर्ष केलं की पुढे असोसिएट प्रोफेसर होता येतं... आणि मग पुढे बढती मिळवत मिळवत सायंटिस्ट होतो माणूस! भारतात एवढेच वाटते की पीएचडी केली की माणूस शास्त्रज्ञ होतो! त्यामुळे... ह्या असल्या प्रस्तावाला काहीही अर्थ नव्हता... मला शास्त्रज्ञ व्हायचे होते... आणि मी अजिबात भारतात गेले नाही. परंतु काही वर्षांनी एकदा मी सर्वांना भेटायला परत घरी गेले... तेव्हा माझ्या नावावर ४ रिसर्च पेपर होते... आणि नामांकित जर्नल्स मध्ये माझे नाव छापून आले होते. मला हे सर्व घरी सांगायचे होते... पण घरी गेले तर ... लग्न... लग्न आणि केवळ लग्न! जर्नल वगैरे ठीक आहे... पण आता लग्नाचे बघा जरा, अशी सूचना मिळायची. नातेवाईकांमध्ये ह्याच्या आधी मुलगी किती हुशार आहे म्हणून मला मिरवले जायचे... पण आता त्यांच्याकडून सुद्धा लग्न करा लवकर... अशा सूचना!! शेवटी बरीच भांडणं करून... मी परत इकडे आले... ह्यावेळेस मात्र खूप त्रासले होते. वैतागले होते... रागावले होते. कुणालाच माझ्या कामाची कदर नाही हे मी जाणले होते... आणि त्याचाच सर्वात जास्त त्रास होत होता! त्यामुळे सुरुवातीचे काही महिने रिसर्च मध्ये लक्ष नव्हतं लागत... रिझल्ट नव्हते येत... कधी कुणी कौतुक केले की घरी सांगावेसे वाटायचे...परंतु ... काहीही उपयोग होणार नव्हता हे देखील माहिती होते! दरम्यान मला थोडेफार समजून घेणारे माझे कलीग्स होते माझ्या बरोबर... त्यांच्या बरोबर वेळ चांगला जाऊ लागला... ते मला समजू शकत होते... कारण ते सुद्धा शेवटी शास्त्रज्ञ होते... आणि ह्या एकटेपणाला सरावले होते. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाशी मी काही वर्ष रिलेशनशिप मध्ये पण होते... काही वर्ष परत एकटीने घालवली... परत एक कलीगशी ओळख वाढली... तो माझ्याने १५ वर्ष मोठा होता... परंतु मला समजून घ्यायचा... रिझल्ट आले नाही आणि मानसिक ताण वाढला की प्रोत्साहन द्यायचा... जवळ जवळ वर्षभर आम्ही एकत्र होतो... पण नंतर तो देखील पुढे दुसरीकडे निघून गेला... आम्ही आहोत अजून टच मध्ये म्हणा...! पण एवढ्यात झाले काय... की बाल्टिमोर मध्ये आमच्या ओळखीच्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत... त्यांनी कुणामार्फत तरी हे सारं घरी सांगितलं! बर्‍याच वर्षांनी घरून फोन आला... मी उचलला तर हे ऐकायला आलं... तुला असले धंदे करायला पाठवले नव्हते अमेरिकेत... पुन्हा आम्हाला तोंड दाखवू नकोस... तू आमच्यासाठी मेलीस! ज्या लोकांना मी केलेल्या कामाचे कौतुक नाही... केवळ निंदाच करता येते... त्यांच्याशी मी तरी संबंध का ठेवू? परिस्थितीने मला अजून कठोर बनवले... आज मिळालेले नोबेल मी माझ्या परिस्थितीला समर्पित करते!"

घरी आलो होतो. बायको मुलाला झोपवून स्वतः कधीच झोपून गेली होती. माझ्या मनात मात्र विचारचक्र सुरूच होते. एका साच्यात आयुष्य जगणार्‍या आपल्यासारख्या लोकांना कळेल का हिची व्यथा? माणसाने शिकावे, मोठे व्हावे, योग्य त्या वयात लग्न करावे, संसार सुरु करावा... सर्व मान्य! परंतु हे आयडियल जगणे झाले. प्रोटोकॉल प्रमाणे! उद्या जर कुण्या एका ध्येयनिष्ठ व्यक्तीने एक अद्वितीय काम करण्यासाठी ही चौकट ओलांडली तर? त्या कामात झोकून देताना हे नियम बाजूला सारले तर? मनाने तो सज्ज होईल देखील! पण त्या वयात असलेल्या शारीरिक गरजा? किंवा कुणासमोर आपण केलेले काम व्यक्त करण्यासाठी त्यावर अवलंबून राहावे लागले तर? त्यातून रिलेशनशिप्स निर्माण झाल्या तर दोष कुणाचा? आणि ह्याला केवळ दोष मानून त्या माणसाला नाकारायचा अधिकार आपल्याला आहे? त्याला वाईट ठरवून वाळीत टाकणारे आपण कोण? घड्याळाच्या काट्याप्रमाणे जीवन जगणारी माणसं! त्यांना वेळ काळ झोकून काम केलेल्या लोकांबद्दल का असेल मग आस्था? इतर लोकांसाठी माहिती नाही... पण डॉ.प्रभुणे माझ्या नजरेत एकदम वरच्या शिखरावर आहे. स्वतःचे ध्येय प्राप्त केलेली एक यशस्वी स्त्री!


 (काल्पनिक)-आशय गुणे :)


This story can also be read here:  http://vishesh.maayboli.com/node/1228

Image Credits: 'Maayboli - http://vishesh.maayboli.com/node/1228 

Friday, February 8, 2013

जेसिका


टेक्सस मधल्या सेन एनटोनिओ ह्या शहरी विद्यार्थी म्हणून असताना माझ्या विद्यापीठातील संगीत विभागाबरोबर जवळ जवळ एक वर्ष काम करायची मला संधी मिळाली. ह्या वर्षभरात अनेक गोष्टी करायला मिळाल्या. मग ते हिस्पनिक संस्कृतीचे 'मरियाची संगीत' ह्या विषयीचे लेक्चर असो, किंवा तिथे मी वाजवलेला पियानो असो. मित्र डेविड ( उल्लेख आधीच्या ब्लॉग मध्ये आहे ) बरोबर मारलेल्या गप्पा असो किंवा त्याच्या बरोबर केलेले सहवादन असो. आणि त्यांच्या 'वर्ल्ड म्युजिक' क्लास मध्ये मी केलेले पियानो वादन आणि नंतर दिलेले एक छोटेसे लेक्चर ही तर अगदी अविस्मरणीय आठवण! ( उल्लेख आधीच्या ब्लॉग मध्ये). ह्या सर्व अनुभवांच्या जोरावर ह्याच 'वर्ल्ड म्युजिक' विषयाचे प्रोफेसर डॉ. मार्क ब्रील ह्यांच्याशी चांगली ओळख झाली होती. त्यांनी मग माझ्यावर अजून एका विषयाची जवाबदारी सोपवली. विद्यापीठ दर वर्षी विशेष कलाकारांना बाहेरून बोलावते आणि इथल्या विद्यार्थ्यांना त्यांची कला अनुभवायला मिळते. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ( सर्व... फक्त संगीत नव्हे!) हे अगदी फुकट अनुभवायला मिळतं आणि जर बाहेरून कुणी येणार असेल तर मात्र तिकीट असतं. ह्याची काळजी घेतली जाते की हे सर्व कलाकार विविध संगीत प्रकारातले आहेत आणि त्यामुळे दर महिन्यात एक असे साधारण वर्षाला ७-८ संगीत प्रकार ( सुट्टीचे महिने सोडून) मुलांना अनुभवायला मिळतात. २०११ च्या मार्च महिन्यात वेळ होती भारतीय संगीताची. भारतातील एक सरोद वादक येणार होते आणि इथल्या मुलांना भारतीय वाद्य संगीत अनुभवायला मिळणार होते. ह्या कार्यक्रमाचा प्रचार ( मार्केटिंग) तिथलीच एक विद्यार्थिनी, जी 'म्युजिक मार्केटिंग' ह्या विषय शिकत होती, करणार होती. माझ्यावर जबाबदारी होती तिला मार्गदर्शन करायची आणि एकंदर सर्व भारतीय लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचवायची. ठरलं तर मग! भेटायचं आणि तयारीला लागायचं! ह्या मुलीचं नाव जेसिका. अतिशय उत्साही मुलगी.
मला प्रोफेसरने तिचा फोन नं आणि इ -मेल आधीच दिला होता. प्रत्यक्ष भेटून ठरवणं तेवढं शिल्लक होतं. तिला लगेच समजावं आणि एकंदर कार्यक्रमाची रूपरेषा काय असावी ह्याचा अंदाज यावा म्हणून मी बरोबर काही 'ऑनलाइन लिंक' देखील तयार ठेवल्या होत्या. आणि ठरलं तर मग! 'येत्या शनिवारी भेटूया' असा मेसेज आला. वर, " ह्या शनिवारी इट वूड बी रेनिंग .. बी रेडी विथ य्युअर रेनवेअर" असे देखील सांगण्यात आले. भारतातला पाऊस ( त्यातून परत मुंबईतला!) अनुभवलेला असल्यामुळे ह्या सूचनेकडे मी विशेष लक्ष न देता शनिवारी आम्ही ठरवलेल्या ठिकाणी , म्हणजेच कॉलेजच्या 'starbucks ' मध्ये गेलो. आणि समोरून "hello aaaaashay " असे ओरडत ओरडत ती जवळ जवळ धावतच आली! आणि आल्या आल्या कडकडून मिठी मारली! हो कडकडूनच! तो क्षण मी एन्जॉय केला हे वेगळे सांगायला नकोच म्हणा! डोळा मारा पाश्चात्य देशातली ही 'सहजपणे' पाळली जाणारी रीत आहे. त्यामुळे ही मिठी मारण्याची क्रिया अगदी नैसर्गिक असते. आपल्या देशातील बऱ्याच मुलामुलींनी ह्याचे अनुकरण केले आहेच. परंतु बऱ्याच वेळेस 'आपण एका मुलीला ( किंवा मुलाला ) मिठी मारतोय' हे मनात असल्यामुळे ती तितकी 'सहज' येत नाही! ( अर्थात माझ्या नंतर येणाऱ्या पिढ्यांनी स्वतःला 'update ' केले देखील असेल!) असो..
" सो .. डॉ . ब्रील मला म्हणाले की भारतीय संगीत ह्यावर भाष्य करणारा आपल्या कॅम्पस मध्ये तू आहेस.. .आणि मला हा इव्हेंट मार्केट करायचा आहे. मी म्युसिक मार्केटिंग शिकते आणि हा कार्यक्रम मार्केट करताना, प्रमोट करताना मला एक वेगळाच अनुभव येईल.. आय एम एक्सायटेड!"
"कुणाचा कार्यक्रम आहे? आणि कधी आहे?" मी विचारले.
" कार्यक्रम मार्च मध्ये आहे. आमचा विचार सुरु आहे की शहरातल्या इंडियन लोकांपर्यंत पोचायचं, इंडियन जेवण मागवायचं, पोस्टर्स छापून सगळीकडे लावायची ... आणि मेक धिस अ ह्यूज सक्सेस!" ती फार उत्साहात होती. शिवाय कार्यक्रम होता मार्च मध्ये आणि आम्ही भेटत होतो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. दूर भारतातून कुठलासा एक कलाकार येणार होता. तिथलं संगीत वेगळं , वाद्य वेगळं पण कार्यक्रम व्यवस्थित आयोजित करायची इच्छा आणि नियोजन मात्र जबरदस्त! हे पाहून मात्र मला आमच्या इंडियन स्टुडंट असोसियेशन (ISA) च्या कार्यक्रमांची आठवण झाली. मी स्वतः ह्या आमच्या संस्थेत कार्यरत होतो पण प्रत्येक वेळेस मग १५ ऑगस्ट असो, दिवाळी असो कि आणखी काही असो... कामाला सुरुवात आठवडा आधीपासून होत असे आणि पुढे ही तयारी कार्यक्रमाच्या एक दिवस आधी रंगात येत असे. आणि हे कशासाठी तर आपल्या स्वतःच्याच उत्सवांसाठी!
परंतु तिने पुढे कुणाचा कार्यक्रम आहे हे सांगितल्यावर तिला थोडं जमिनीवर घेऊन येणं प्राप्त होतं!
" आम्ही एका भारतीय कलाकाराला बोलवत आहोत. तो ...आय गेस ..'सरोड'... वाजवतो. आमच्या वर्ल्ड म्युजीक क्लास मध्ये दर वर्षी ४ ते ६ फॉरेन कलाकार असतात ज्यामुळे इथल्या मुलांना जगातले उत्तम दर्जेदार संगीत ऐकायला मिळते .. दे बिकम ग्लोबल इन म्युजीक यु नो", ती सांगत होती. संगीत शिकवताना असलेली ही वैश्विक भावना! अशा विद्यापीठातून जो कुणी उत्तीर्ण होत असेल त्याचा कान सर्व प्रकारच्या संगीतासाठी अगदी तयार होत असेल! सगळीच मुलं काही तशी नसतील पण जी काही थोडीफार असतील ती मात्र नक्कीच चांगली 'कानसेन' होत असतील! आपल्याकडे संगीत शिकवणारे 'मास्तर' किंवा 'गुरुजी' ह्या भावनेने शिकवतील का हा विचार काही क्षण का होईना माझ्या मनात आला आणि तिने उच्चारलेल्या 'सरोड' चे 'सरोद' करीत मी पुढे विचारले.
" मला जर बघायला मिळेल का.. तुम्ही आतापर्यंत कुठले कलाकार बोलावले आहेत ते?"
"येस .. व्हाय नॉट ... टेक दीज लीफलेट्स.....ही घे अजून काही", ते सर्व पुढे करीत ती म्हणाली. मी पाहतो तर वेगवेगळ्या देशातून अनेक कलाकार ह्या कार्यक्रमांच्या सत्रात सहभागी झाले होते. त्यांची माहिती होती, त्यांचा संगीत प्रकार लिहिला होता आणि ते कधी येउन गेले ही तारीख होती. आणि शेवटी त्यांनी ह्या भारतीय कलाकाराबद्दल उल्लेख केला होता, अर्थात येत्या मार्च महिन्याचा. मी सर्व कलाकारांबद्दल त्या 'लीफलेट्स' वर लिहिलेली वर्णनं वाचली आणि मला लक्षात आलेली आणि किंचित खटकलेली गोष्ट तिला बोलून दाखवली.
" तुम्ही विविध प्रकारच्या कलाकारांना बोलवत आहात... थिस इज रिअली गूड! पण तुम्ही इतर कलाकारांच्या पोस्टर्स वर जसं वर्णन केलं आहे तसंच इंडिअन म्युजिक बद्दल पण करा.. आय मीन.. ", मी बोलायला सुरुवात केली. तिने भुवया थोड्या उंचावल्या आणि एका हातावर आपली मान टेकवून ऐकू लागली. दुसरा हात केसांशी खेळण्यात गुंतला होता.
" हा कलाकार बघ ना ", मी हातात एक पोस्टर घेऊन सांगू लागलो. " Be prepared for an exciting evening full of energizing music .... असं वर्णन आहे. आता ह्या पोस्टर मध्ये बघ ( मी दुसऱ्या एका कलाकाराचे पोस्टर उचलले ..) ... इकडे देखील तुम्ही energy , excitement वगेरे adjectives वापरली आहेत. आणि आता आपल्या कलाकाराचे वर्णन बघ... "
ह्या पोस्टर वर मात्र ' music that takes you to the world of spirituality and self -understanding ' असं वर्णन केलं होतं. वर्षानुवर्ष शास्त्रीय संगीत हे एका वर्गापर्यंत सीमित का होऊन बसले ह्याची जणू साक्षच! आणि पुढे मी तुला म्हणालो की जर आपल्याला ह्या कार्यक्रमाला बऱ्याच लोकांना बोलवायचे असेल तर ह्या संगीताचे तसे मार्केटींग होणे गरजेचे आहे!
" हो .. ते खरं आहे. पण भारतीय लोकांचे काय? ते तर येतीलच ना? इतर लोकांचं आपण बघून घेऊ", ती म्हणाली. तिला अर्थात कार्यक्रम 'भरायचा' देखील होता आणि त्यामुळे तिला सर्वात जास्त अपेक्षा होती ती भारतीय लोकांकडून. पण एक शास्त्रीय मैफल आहे असे कळल्यावर भारतीय लोक तिकीटासाठी रांग लावतील हा तिचा गैरसमज मी काही क्षणातच दूर केला.
"भारतात ह्या संगीताबद्दल सतत ह्याच प्रकारचं वर्णन केलं जातं . शास्त्रीय म्हणजे काहीतरी वेगळं, कठीण, गूढ. शास्त्रीय संगीतामुळे देवापर्यंत पोचता येतं असं आमचे कलाकार सतत सांगत आले आहेत. त्यामुळे हा आपला प्रांत नाही असंच सामान्य माणसाला वाटत आलेलं आहे. पण ह्या संगीतात पण तितकीच excitement असू शकते... हे जर आपण लोकांना दाखवून दिलं तर मात्र आपण अधिक लोकांना आकर्षित करू शकू. भारतीयच नव्हे.. तर इतरही लोक ह्या कार्यक्रमाला येतील", मी म्हणालो. ती लक्ष देऊन ऐकत होती पण तरीही तिला पूर्णपणे पटतंय असं वाटत नव्हतं.
" बट यु नो आशय... ही माहिती म्हणजे ह्या कलाकाराचा review झाला ना .... तोच मी ह्या पोस्टर द्वारे मार्केट करतेय! आपण तो बदलायचा?"
" हो.. त्यात काय विशेष? आपण स्वतः असं वर्णन लिहूया. कारण भारतीय संगीत, विशेषतः वाद्य संगीत हे नक्कीच exciting असतं. तुला demo ऐकायचा आहे का? आणि मी माझे हुकुमी एक्के बाहेर काढले. laptop उघडला आणि youtube वर आशिष खान आणि झाकीर हुसैन ह्यांचा video सुरु केला. आणि माझी अपेक्षा खरी ठरली. अवघ्या २ मिनिटात ती ऐकण्यात गुंग झाली! आणि शेवटी ह्या दोन्ही उस्तादांनी अति द्रुत लयीत वाजवून वादन संपवलं तेव्हा कुठे ती भानावर येउन टाळ्या वाजवत म्हणाली, " It was amazing !" पाच मिनिटांच्या ह्या video मधल्या दोन्ही उस्तादांच्या 'सवाल - जवाब' मध्ये झाकीरने पाव सेकंदात हातोडी काढून तबल्यावर फिरवून एक आवाज काढला आहे. तो तर तिला कमालीचा आवडला! "How did he do that ", असं माझ्याकडे बघून तिने म्हटलं! शास्त्रीय संगीताचे मार्केटिंग आता वेगळ्या पद्धतीने होणार होते ह्याची मला खात्री पटली! डोळा मारा

video
हाच तो video !!! :)पुढे मग थोडा वेळ video मधले हे कलाकार कोण, ते कुठे राहतात वगेरे विषय झाले. रवि शंकर, अली अकबर खान ह्यांचा विषय नसता निघाला तर नवल! पुढे कॅलिफोर्निया मधले 'अली अकबर कॉलेज ऑफ म्युजिक' बद्दल पण तिला थोडे सांगितले आणि त्याबद्दलचे videos दाखवले गेले. त्या दिवसाचे आमचे session संपले. " Thank You Aashay ..you did give me a lot of information ", असं म्हणत म्हणत तिने मला पुन्हा एकदा मिठी मारली. मिठी मारताना मात्र तिच्या मागे लांब एक भारतीय मुलगा येताना मला दिसला. त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या 'तसल्या' हसण्याकडे बघून माझ्या मिठीमुळे माझ्याबद्दल बोलायला आणि 'आमच्या दोघांबद्दल' बरीच स्वप्न रंगवायला ह्याला पुढे भरपूर वाव मिळणार आहे हे माझ्या ध्यानात आले! पुढील मिटिंगची तारीख ठरवून मी घरी परत आलो.
मला देखील होमवर्क मिळाले होते. ह्या कार्यक्रमाचा प्रचार शहरात कुठे करायचा, कुणाला सांगायचे हे सारे बघायचे होते. विद्यापीठात दोन संस्था होत्या. एक आमची इंडियन स्टूडंट असोसिएशन (ISA) आणि दुसरी म्हणजे अमेरिकेत जन्म झालेल्या आणि तिकडे वाढलेल्या मूळ भारतीय मुलांनी सुरु केलेली इंडियन कल्चरल असोसिएशन ( ICA ). माझे मित्र दोन्ही संस्थांमध्ये होते. गंमतीचा भाग म्हणजे ICA वाल्यांनी ह्यासाठी जास्त उत्सुकता दर्शवली आणि आम्ही जमेल तितकी आणि जमेल तिकडे पोस्टर्स लावू आणि आमच्या घरी देखील सांगू अशी आश्वासनं दिली. त्या नंतर आमच्याच शहरात राहणारा आणि सरोद हेच वाद्य वाजवणारा स्टीव मिलर. स्टीव बद्दल आधी लिहिले आहेच. हा माझा हुकुमी एक्का होता. कारण हा स्वतः आली अकबर खान ह्यांच्याकडे सरोद शिकला होता आणि ह्याच्या ओळखीचे बरेच कलाकार आणि विशेष म्हणजे भारतीय संगीत ऐकणारे कलाकार ह्या सर्वांपर्यंत मला पोचता येणार होते. त्याने लगेच होकार कळवला आणि मदतीचे आश्वासन दिले! स्टीवमुळे मला शहरातल्या एका 'योग इन्सटीट्यूट' ( मी 'योगा' म्हणत नाही. सॉरी !!!) चा पत्ता मिळाला होता आणि त्याच्या बरोबर तिकडे जायचे भाग्य देखील लाभले होते. त्यामुळे त्यांना देखील मी ह्या कार्यक्रमाबद्दल सांगितले आणि ते देखील आनंदाने त्याचा प्रचार करायला तयार झाले. आणि शेवटी 'इंडिया असोसिएशन ऑफ सेन एनटोनियो' ही भारतीय लोकांची भलीमोठी संस्था! ह्या सगळ्यांनी मदत करायचे मान्य केले. ह्या व्यतिरिक्त शहरात काही 'डान्स इन्सटीट्यूटस' देखील होत्या. पण त्यांच्याकडून काही विशेष मदत मला मिळाली नाही. पण कार्यक्रम आहे ही बातमी आता बऱ्याच लोकांपर्यंत जाणार ह्याची खात्री पटली होती!
जेसिकाला साहजिकच ह्याचा फार आनंद झाला होता. तसं बघायला गेलं तर सेन एनटोनियो हे शहर संगीत, कला वगेरे साठी अजिबात प्रचलित नाही. टेक्सस मधील मौज-मस्ती करायचे ठिकाण अशा नजरेने त्याकडे पाहिले जाते. ह्यांची बास्केटबॉल टीम अगदी प्रसिद्ध आणि त्यामुळे शहरात ह्या खेळाचे चाहते खूपच! परंतु संगीत, कला वगेरे म्हटलं की इकडच्या लोकांचे बोट ह्युस्टन किंवा ऑस्टीन कडे वळते. नेमकी ह्याच गोष्टीची काळजी जेसिकाला होती. शिवाय कार्यक्रम होता सोमवारी! परंतु झालेला प्रचार पाहून तिला बरं वाटलं. दुसऱ्यांदा झालेल्या भेटीत भारतीय संगीताबद्दलची अजून थोडी माहिती माझ्याकडून देण्यात आली. हिंदुस्थानी संगीत पद्धती, कर्नाटकी पद्धती, तबला, सरोद ह्यांची माहिती तिने घेतली. राग म्हणजे काय, त्यांची गायची, वाजवायची वेळ, ऋतु संबंधित राग वगेरे बरंच काही. ती हे सगळं लिहून काढत होती आणि डॉ. ब्रील ह्यावर नंतर कार्यक्रमाच्या वेळेस बोलणार होते.
आणि मग कार्यक्रमाचा दिवस उजाडला. मार्च मधला टेक्सन उकाडा सहन करीत बरीच लोकं कार्यक्रमाला आली होती. हॉल जवळ जवळ ८० टक्के भरला होता. स्टीव मिलर बऱ्याच कलाकारांना घेऊन आला होता. बरेच भारतीय चेहरे होते. विद्यापीठाच्या संगीत विभागातील विद्यार्थी आले होते. कार्यक्रम बरा झाला. टेक्सस मध्ये नाव कमावलेले तबलजी ह्या कार्यक्रमाला देखील साथीला होते. पण त्यांनी देखील निराशाच केली. पण इथल्या लोकांना 'एक वेगळा अनुभव' ( केवळ) म्हणून हा कार्यक्रम आवडला. कार्यक्रम झाल्यावर विद्यार्थ्यांनी कलाकारा भोवती चांगलीच गर्दी केली. आणि रवि शंकर, सतार, सरोद, भारतीय संगीत ह्याबद्दल खूप प्रश्न विचारले. हे बघून मात्र नक्कीच आनंद वाटला आणि असे श्रोते तयार केल्याबद्दल रवी शंकरांना मनातल्या मनात वंदन केलं!
" धन्यवाद आशय!!! एका सोमवारच्या संध्याकाळी.. सेन एनटोनिओ सारख्या शहरी .. ह्या कार्यक्रमासाठी इतकी माणसं जमणं ... it means a lot for us !!!" जेसिका मला आनंदाने सांगू लागली. आणि जाता जाता परत एकदा कडकडून मिठी मारली! परंतु ह्या मिठीमुळे आमच्याबद्दल पुढे काहीही स्वप्न रंगवली जाणार नाहीत ह्याची मला खात्री होती. कारण 'भारतीय' संगीताचा हा कार्यक्रम ऐकण्यात विद्यापीठातील 'भारतीय' विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व मी एकट्याने केले होते!

- आशय गुणे स्मित

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | Best Web Hosting